नाशिक : हनी ट्रॅप प्रकरणी मुंबई नाका परिसरातील एका तारांकित हॉटेलमधील 'ती' खोली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने शनिवारी (दि. १९) सील केल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी सायंकाळी या चर्चांचे खंडण केल्याने ही चर्चा फोल ठरली आहे.
राज्यभरात सध्या ७२ वरिष्ठ अधिकारी आणि आजी-माजी मंत्र्यांच्या हनी ट्रॅपची जोरदार चर्चा आहे. विधीमंडळातही हा मुद्दा गाजत असल्याने, या प्रकरणाचे दररोज गांभीर्य वाढत आहे. दरम्यान, शनिवारी (दि.19) विशेष पोलिस पथकाने नाशिकमध्ये येत मुंबई नाका परिसरातील पंचतारांकित हॉटेलमधील 'ती' खोली सील केल्याची, तसेच या प्रकरणातील हॉटेल मालक आणि संबंधित महिलेचा जबाब नोंदवून घेतल्याची दिवसभर चर्चा होती. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी अधिकृतपणे, नाशिक शहर किंवा बाहेरील अन्य पोलिसांनी शहरातील कोणतेही हॉटेल तपासले किंवा सील केले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हनी ट्रॅपबाबतची ही चर्चा देखील फोल ठरली.