Doctor Pudhari
नाशिक

Government Doctors | ग्रामीण भागातील सरकारी डॉक्टरांसाठी मोठा निर्णय! आता कामाचे तास होणार निश्चित

Government Doctors | ग्रामीण भागातील सरकारी डॉक्टरांसाठी मोठा निर्णय! आता कामाचे तास होणार निश्चित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांत अहोरात्र सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास आता निश्चित होणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार १० सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

कामाच्या वेळेचे नियोजन करण्याबरोबरच केंद्र शासनाच्या धर्तीवर पदोन्नती योजना आणि कल्याण निधी लागू करण्याबाबत ही समिती सखोल अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. २४ तास उपलब्ध राहण्याच्या अपेक्षेमुळे डॉक्टरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार 'महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना गट-अ' कडून केली जात होती.

या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबरला आरोग्यमंत्री आबिटकर आणि 'मॅग्मो'च्या पदाधिकाऱ्यांत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव दीपक केंद्रे यांनी सोमवारी (दि. २३) समिती स्थापनेचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. समितीचे आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर हे अध्यक्ष असून, आरोग्य सेवा सहसंचालक आर. बी. भालेराव हे सदस्य सचिव आहेत. समितीत शासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समतोल साधण्यात आला आहे.

उपसचिव दीपक केंद्रे, धाराशिवचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, 'एसएचएसआरसी'चे कार्यकारी संचालक डॉ. रामजी आडकेकर, 'मॅग्मो'चे अध्यक्ष डॉ. राहुल कन्नमवार, सरचिटणीस डॉ. संतोष हिंडोळे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संदीप गेडाम, सहसचिव डॉ. संघर्ष राठोड आणि डॉ. मोहन बच्चार हे सदस्य आहेत. समितीने आपला अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर केल्यानंतर, आरोग्य सेवा आयुक्तांनी त्यावर आपले स्पष्ट अभिप्राय नोंदवून अहवाल अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा, अशा सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

'या' तीन विषयांवर समिती देणार अहवाल

१. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास स्पष्टपणे निश्चित करणे, जेणेकरून त्यांच्यावरील अतिरिक्त ताण कमी होऊन रुग्णसेवेचा दर्जा सुधारेल. २. केंद्र शासन आणि इतर राज्यांमध्ये लागू असलेल्या 'डायनॅमिक अश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन' योजनेचा अभ्यास करून, राज्यातील डॉक्टरांना वेळेत पदोन्नती व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शिफारस करणे. ३. वैद्यकीय अधिकारी गट-अ कल्याण निधी योजनेचा विस्तृत अभ्यास करून समितीची रचना, कार्यकक्षा आणि निधीच्या अंमलबजावणीची पद्धत निश्चित करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT