Farmer Loan Subsidy | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नियमित कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार 50 हजारांचे अनुदान pudhari photo
नाशिक

Farmer Loan Subsidy | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नियमित कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार 50 हजारांचे अनुदान

Farmer Loan Subsidy | राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान लवकरच दिले जाईल, असे महत्त्वाचे संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान लवकरच दिले जाईल, असे महत्त्वाचे संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत या अनुदानाची तरतूद करण्यात आली असून, याचा लाभ राज्यातील सुमारे २० लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१९ व्या आंतरराष्ट्रीय 'कृषीथॉन २०२६' प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २६) कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांच्या आतील आहे, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २० लाखांच्या घरात आहे.

प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील तरतुदीनुसार त्यांना प्रोत्साहन अनुदान वितरण करण्याबाबत शासनस्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतीच्या वीजपुरवठ्याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांना २४ तास वीज देणे सध्या शक्य नसले, तरी कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवारही सक्षम

खा. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री भरणे यांनी सुनेत्रा पवार यांची पाठराखण केली. मुख्यमंत्री हेच राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे त्यांचे संपूर्ण राज्यावर लक्ष आहे. पुणे हा अजितदादांचा जिल्हा असून, सुनेत्रा वहिनी पालकमंत्री म्हणून तिथे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांचा टीका करण्याचा तसा उद्देश नसेल, असे नमूद करीत ते म्हणाले की, त्या दोघी एकाच घरातील आहेत, त्यामुळे त्यांना एकमेकींच्या कामाचा आवाका माहिती आहे. सुनेत्रा वहिनी अत्यंत खंबीर आहेत. त्यांनी आपल्या पतीकडून कामाचे धडे घेतले असल्यामुळे त्या अतिशय चांगले काम करीत असल्याचेही मंत्री भरणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT