Maharashtra Epstein Files Teaser Release 
नाशिक

Maharashtra Epstein Files Teaser Release | खोट्या अध्यात्माचा खरातचा काळा चेहरा पडद्यावर

Maharashtra Epstein Files Teaser Release | अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; ३ ऑक्टोबर रोजी होणार रिलीज

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'आता सगळं उघड होणार... पडद्यामागे वाढत होतं त्याचं साम्राज्य... नाव मोठं, लक्षण खोटं...' अशा आक्रमक संवादांनी सुरू होणाऱ्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या आगामी मराठी चित्रपटाच्या टीझरने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे.

नाशिकमध्ये गाजलेल्या आणि सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणावर आधारित हा चित्रपट ३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टीझरमध्ये कथित भोंदूबाबाच्या भूमिकेची झलक दाखविली असली, तरी ही भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे, याबाबत निर्मात्यांनी अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असलेली व्यक्तिरेखा साकारत असल्याची चर्चा आहे.

टीझरमधील एका दृश्यात कथित भोंदूबाबा आलिशान वाहनातून मंदिर परिसरात उतरतो आणि त्यांच्या शेजारी छत्री घेऊन चालणारी महिला दिसते. हे दृश्य यापूर्वी सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या छायाचित्राशी साधर्म्य असल्याचे बोलले जात आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांचीही टीझरमध्ये झलक पाहायला मिळते.

दरम्यान, या चित्रपटावर आक्षेप घेत न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, चित्रपटाची घोषणा आणि आता टीझर प्रदर्शित झाल्यानंतर तो नियोजित वेळेत प्रदर्शित होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महिला लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणाने मोठी खळबळ उडवली होती. आता या घटनांचे चित्रपटात नेमके किती वास्तववादी चित्रण केले आहे, कथित पीडितांच्या भूमिका कोण साकारणार आणि पडद्यावर आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार, याकडे प्रेक्षकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चर्चेला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT