नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात झपाट्याने होणारे नागरीकरण आणि त्या तुलनेत नागरी सुविधा पुरवण्यात अपुरे पडणारे प्रशासन या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील स्थानिक समस्यांना थेट हात घालत मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 'शहर परिवर्तन गट' ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २०) राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. योग्य नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे आज राज्यातील अनेक लहान-मोठी शहरे बकाल झाली आहेत.
खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, ढासळलेली आरोग्यव्यवस्था, कचरा व्यवस्थापनाचा फज्जा, रहदारीतील वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यांसारख्या गंभीर समस्यांना रोजच्या जीवनात नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन केवळ विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी लाटत असल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. या सर्व स्थानिक समस्यांना केंद्रस्थानी ठेवून जनतेचा आवाज उठवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे.
शहरांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या 'शहर परिवर्तन गट'च्या अध्यक्षपदी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, तेलंगणाचे सहप्रभारी व वरिष्ठ प्रवक्ते सचिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संग्राम थोपटे यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गुरुवारी राज्यातील प्रत्येक महापालिका क्षेत्रात स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या मोहिमेची सविस्तर रूपरेषा जाहीर केली जाणार आहे. शहरांमधील मध्यमवर्गीय आणि नागरी मतदारांशी थेट संवाद साधून पक्षसंघटन मजबूत करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न मानला जात आहे.