नाशिक : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्यापासून व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी चर्चेत आहे. डीजीसीएने व्हीएसआरच्या चार विमानांना ग्राउंड करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी याच व्हीएसआरच्या विमानाचा वापर केला. ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला, त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार पुण्याहून बारामतीला जाताना व्हीएसआरच्या प्रायव्हेट जेटने निघाले होते. त्या विमानाचा अपघात बारामती विमानतळाजवळ झाला. त्यानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विमानाबाबत आमदार रोहित पवारांसह अनेक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले.
या कंपनीच्या विमान सेवेवर आरोपही झाले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नसल्याचे जाहीर केले. शिंदे शिवसेनेचे कोणतेही मंत्रीही हे विमान वापरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ही कंपनी वादात सापडली आहे. असे असतानाच शुक्रवारी (दि. २७) मुंबईहून नाशिक येथे येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांनी चौथे विश्व मराठी संमेलनासाठी याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, मंत्री भुजबळ ओझर विमानतळावर आले.
व्हीएसआर संदर्भात तर्कवितर्क सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मराठी भाषा विभाग शिवसेनेचे मंत्री सामंत यांच्याकडे असल्याने एकनाथ शिंदे उपस्थित राहतील, अशी शक्यता होती. मात्र, ते आले नाहीत. शिक्षणमंत्री दादा भुसे नाशिकचे असूनही ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.