नाशिक : पुढारी वृत्तसेवा
व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्विवार्षिक निवडणुकीची रंगत वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन उपाध्यक्ष पदांसह नाशिक २७, धुळे ३, आहिल्यानगर १ व जळगाव ४ इतक्या गव्हर्निंग कौन्सिलच्या जागांसाठी तीन पॅनल आमने-सामने आहेत. त्यातील दोन पॅनलने ५० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, आता उमेदवारी माघारीवरून पॅनलमध्येच अंतर्गत पेच निर्माण होत आहे.
इच्छुक निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने, पॅनलप्रमुखांना आता घाम फुटत आहे. २०२१ नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र चेंबरची निवडणूक होत आहे. त्यावेळी अध्यक्ष, २ उपाध्यक्ष आणि २७ गव्हर्निंग कौन्सिल सदस्य बिनविरोध निवडले होते. यावेळी बिनविरोध निवडणुकीचा शक्यता धुसर असून एकता, प्रगती आणि विकास पॅनलने दंड थोपटले आहेत. पॅनलचे प्राबल्य दाखवण्यासाठी प्रमुखांनी अधिकाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा डाव खेळला. मात्र, तो डाव अंगलट येण्याची शक्यता आहे.
अर्ज दाखलच्या अखेरच्या दिवसापर्यंत दोन उपाध्यक्षपदासह नाशिक २७, धुळे ३, अहिल्यानगर १ आणि जळगाव ५ या गव्हर्निंग कौन्सिलच्या जागांसाठी १३४ अर्ज दाखल झाले. सोमवारी (दि.२५) अर्ज छाननी असून, पात्र उमेदवारांची यादी २६ मे रोजी जाहीर होईल. माघारीची मुदत २९ मेपर्यंत आहे. जागांच्या तुलनेत उमेदवारी अर्ज दुपटीने दाखल झाल्याने, इच्छुकांना शांत करण्याचे आव्हान प्रमुखांसमोर आहे.
एकता पॅनलकडून ६४ अर्ज दाखल झाले. त्यात एका उपाध्यक्षपदासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले असून, गव्हर्निंग कौन्सिलच्या २७ जागांसाठी ५९ अर्ज दाखल झाले. पॅनलने लोकशाही पद्धतीने उमेदवार निवडले जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने, कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार याविषयी उत्सुकता आहे.
शेठ वालचंद, हिराचंद प्रगती पॅनलकडून ५२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीन अर्ज एका उपाध्यक्षपदासाठी आहे. उर्वरित गव्हर्निंग कौन्सिलसाठी आहेत. त्यामुळे येथेही उमेदवारांना शांत करण्याचे आव्हान पॅनलप्रमुखांसमोर आहे. उत्तर महाराष्ट्र विकास पॅनलमध्ये १८ अर्ज दाखल असून, इच्छुकांची संख्या समतोल असली तरी, पॅनलसमोरील आव्हाने कायम आहेत.
समाजमाध्यमांवर प्रचार
माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, तिन्ही पॅनलप्रमुखांनी प्रचारास प्रारंभ केला आहे. सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मतदारांना साद घातली जात आहे. सभासदांशी संपर्क साधत, त्यांना पॅनलचे व्हिजन सांगितले जात आहे. पॅनलमधील प्रचार बघता, बिनविरोध निवडणुकीची शक्यता धूसर आहे.
आरोप-प्रत्यारोप अन् आश्वासन
मागील घडामोडींचा संदर्भ देत पॅनलकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एका पॅनलने, चेंबरमध्ये अस्वस्थता निर्माण करणाऱ्या व्यक्तीचेच नेतृत्व स्वीकारले आहे. चेंबरमध्ये हुकुमशाही कारभार बघावयास मिळू शकतो, असा प्रचार केला जात आहे. दुसऱ्या पॅनलकडून सातपूरला चेंबरचे कार्यालय उभारण्याचे आश्वासन दिले जात आहे.