Maharashtra Chamber election complaint 
नाशिक

Maharashtra Chamber of Commerce Election | महाराष्ट्र चेंबरसाठी 74 टक्के मतदान

Maharashtra Chamber of Commerce Election | उद्या मतमोजणी अन् निकाल : राज्यातही मतदारांचा चांगला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी नाशिक विभागातून सुमारे ७४ टक्के इतके मतदान झाले आहे. तीन दिवस राबविण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत १,५६२ पैकी पहिल्या दिवशी ३६७, दुसऱ्या दिवशी ४११ तर तिसऱ्या दिवशी ३७७ असे एकूण १,१५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राज्यात ५,९१७ पैकी ३,००२ इतके मतदान झाले.

सोमवारी (दि. १५) मुंबई येथील महाराष्ट्र चेंबरच्या मुख्यालयात मतमोजणी होणार असून, लगेचच निकालही जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला? याची एकच चर्चा व्यापार, उद्योग क्षेत्रात रंगत आहे. 'मुद्द्यावरून गुद्यापर्यंत पोहोचलेल्या यावेळच्या निवडणुकीत एकता आणि प्रगती पॅनलमध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदासह नाशिक, जळगाव आणि कोकण विभागात निवडणूक झाली.

विशेषतः नाशिक विभाग उपाध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलची लढत चांगलीच चर्चिली गेली. एकता पॅनल पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली, तर प्रगती पॅनलने मोजक्याच उमेदवारांसह लढत दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रंगलेल्या या निवडणुकीत अर्ज छाननी अन् तक्रार निवारण समितीमधील वाद थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला.

याशिवाय पॅनल प्रमुखांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे राज्यभरातील व्यापारी, व्यावासायिक आणि उद्योजकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. नवी मुंबई, पुणे, ठाणे, कुडाळ, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, धुळे या ठिकाणी एक दिवसाची मतदान प्रक्रिया पास पडल्यानंतर मुंबई आणि नाशिक येथे तीन दिवसांची मतदान प्रक्रिया शनिवारी (दि.१३) संपली.

नाशिकमध्ये तिन्ही दिवस मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. शहरासह ग्रामीण भागातीला मतदारांनी हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या पहिल्या दिवशी बाउन्सरवरून प्रगती पॅनलच्या प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने, काहीसा तणाव वाढला होता. मात्र, नंतर दोन्ही पॅनल प्रमुखांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने पुढील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, दोन्ही पॅनलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारीच (दि.१३) मतपेट्या सील करून मुंबई येथील महाराष्ट्र चेंबरच्या मुख्यालयाता पाठविण्यात आल्या आहेत.

आठ मतांची संगणकात नोंद नाही

नाशिक विभागासाठी झालेल्या ११५५ पैकी ११४७ मतांची संगणकात नोंद झाली असून, उर्वरित ८ मतांची नोंद झालेली नाही. मात्र, ही मते वैध असल्याचे सांगितले जात आहे. ही मते नूतन सभासदांची असून, त्यांनी सभासदत्वासाठी लागणारी कागदपत्रे जमा केली नसल्याने त्याची नोंद संगणकात झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या मतदारांनी सभासदत्वासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच सभासदत्व शुल्क भरल्याची पावती जमा केलेली असल्याने ही मते वैध ठरविली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT