नाशिक : नाशिकमध्ये नवीन उद्योग येण्यास इच्छुक असून, त्यांना इगतपूरी तालुक्यात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सामंत यांची बुधवारी (दि.११) मंत्रालयात भेट घेतली. यावेळी सातपूर आणि अंबड या मदर इंडस्ट्रीमध्ये भूखंड उपलब्ध नसल्याने, नवे उद्योग परतत आहेत. याशिवाय स्थानिकांना विस्तारासाठी देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात इगतपूरी तालुक्यात भूखंड उपलब्ध करून दिल्यास, मोठ्या समुहाचे नवीन उद्योग येण्यास मदत होईल. त्यामुळे उद्योगमंत्री यांनी सकारात्मकता दर्शवित नाशिक-इगतपूरीदरम्यान, उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे शाखा को-चेअरमन संजय राठी, कार्यकारिणी सदस्य हेमंत कांकरिया, रतन पडवळ उपस्थित होते.