नाशिक (पुढारी वृत्तसेवा):
राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ चे संभाव्य परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा राज्यात २१ सीईटी परीक्षा घेतल्या जाणार असून, पैकी ११ अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली. जानेवारी २०२७ पासून सुरू होणारा परीक्षांचा हा सिलसिला १० जूनपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत गुण सुधारण्याची संधी मिळावी, या उद्देशाने दोन वेळा सीईटी घेण्यात येणार्या अभ्यासक्रमांची संख्या तीनवरून ११ करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावर जेईई मेनची परीक्षा दोन सत्रांत घेतली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दुसरी संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांची भर पडली आहे. एमसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीडीएमची पहिली परीक्षा २८ ते ३० जानेवारीदरम्यान, तर दुसरी परीक्षा १ ते ३ एप्रिलदरम्यान होणार आहे.
पाचवर्षीय एलएलबीची पहिली परीक्षा २८ व २९ मार्चला, तर दुसरी परीक्षा २४ मे रोजी होईल. पीसीबीची परीक्षा ८ ते १३ एप्रिल आणि दुसरी परीक्षा ६ ते ८ मेदरम्यान होणार आहे. पीसीएमची पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिल, तर दुसरी परीक्षा १० ते १५ मेदरम्यान होईल.
बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांची पहिली परीक्षा २८ ते ३० एप्रिल, तर दुसरी परीक्षा २७ व २८ मे रोजी होणार आहे. याशिवाय एमएचएमसीटी, एमसीए, तीनवर्षीय एलएलबी, बी.डिजाइन, नर्सिंग, बीएड, एमएड आणि एमपीएड यांसारख्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार एमपीएड, एमएड आणि बीएडच्या परीक्षा जुन महिन्यात ठेवण्यात आल्या आहेत.
एकूण सीईटी परीक्षा: २१
दोन संधी असलेले अभ्यासक्रम: ११
नव्याने समाविष्ट अभ्यासक्रम: ३
२०२६ मधील एकूण नोंदणी: १८,१४,४५६
२०२६ मध्ये प्रत्यक्ष परीक्षा दिलेले विद्यार्थी: १६,३१,३३५
एकात्मिक बीएड-एमएडच्या एकूण जागा: ५५
या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी: १२