नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करताना रिक्षाचालक-मालक. (छाया: हेमंत घोरपडे) 
नाशिक

Nashik Auto Rickshaw Protest Against App Transport | अॅपआधारित वाहतुकीविरोधात रिक्षाचालक-मालक आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे : ओला, उबर, रॅपिडो, बाइक टॅक्सीवर बंदीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अॅपआधारित वाहतूक कंपन्यांची वाढती स्पर्धा, आरटीओमधील विविध कामांसाठी आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क आणि वाहन पासिंग प्रक्रियेतील कथित आर्थिक लूट अशा विविध प्रश्नांवरून नाशिकमधील रिक्षाचालक - मालक यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपासह आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे.

अॅप आधारित ओला, उबर, रॅपिडो आणि बाइक टॅक्सीवर बंदी घालण्यासह विविध मागण्यांसाठी नाशिक शहरातील विविध रिक्षा चालक मालक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. भद्रकाली ऑटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष तथा रिक्षा चालक - मालक संघटना कृती समितीचे उपाध्यक्ष हैदर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाइन अॅप आधारित कंपन्यांच्या स्पर्धेमुळे परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांचा व्यवसाय अडचणीत आला असून अनेकांनी कर्ज काढून वाहने घेतल्यामुळे आर्थिक संकट अधिक गडद झाल्याने चालक मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनात भद्रकाली ऑटोरिक्षा युनियन, बाळासाहेब पाठक श्रमिक सेना, नाशिकरोड रिक्षा संघटना, राष्ट्रीय मजदूर रिक्षा चालक संघटना, महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेना, नवसंघर्ष रिक्षा संघटना आणि राष्ट्रवादी वाहतूक संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष हैदर सय्यद, यांच्यासह सुनील बागूल, बाळासाहेब पाठक, शशी उन्हवणे, नितीन पगारे, आजीम सय्यद, समाधान अहिरे, नितीन मुर्तडक, सागर भास्कर आणि संतोष भागवत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. प्रवासी रिक्षा अडविण्याचे प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही आंदोलकांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना अडवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र समन्वयकांनी रिक्षा चालकांवर जबरदस्ती करू नये, असे आवाहन केल्यानंतर काही रिक्षाचालक आंदोलस्थळावरून निघाले.

प्रवेशद्वार बंद केल्याने वाहतूक कोंडी

रिक्षाचालकांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार काही काळासाठी बंद केले. मात्र त्यामुळे कार्यालय आवारात येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांची दुसऱ्या गेटवर कोंडी झाली होती.

फाटलेले कपडे घालून वेधले लक्ष

रिक्षाचालकांच्या समस्या मांडताना एका रिक्षाचालकाने चक्क फाटलेले कपडे घालून सरकारच्या धोरणाविरोधात निषेध नोंदविला. सरकारच्या धोरणामुळे आमची अशी अवस्था झाली असल्याचे त्याने कपड्यांवर लिहिले होते. तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणीचा मजकूर उपस्थिकांचे लक्ष वेधून घेत होता

रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या

ओला, उबर, रॅपिडो, बाइक टॅक्सीच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी.

वाहनाचे बँक कर्ज कमी करणे, मालकी हस्तांतरणासाठी एकदाच शुल्क आकारणे.

आनंद दिघे कल्याणकारी महामंडळाचे शुल्क भरण्याची सक्ती न करता लाभ द्यावा.

एलपीजी, सीएनजी गॅस पासिंगसाठी १ हजार ५०० रुपये शुल्क आकारावे.

पासिंगवेळी रेडियम लावण्याची सक्ती आणि होणारी आर्थिक लूट थांबवावी

फाटलेले कपडे घालून वेधले लक्ष

रिक्षाचालकांच्या समस्या मांडताना एका रिक्षाचालकाने चक्क फाटलेले कपडे घालून सरकारच्या धोरणाविरोधात निषेध नोंदविला. सरकारच्या धोरणामुळे आमची अशी अवस्था झाली असल्याचे त्याने कपड्यांवर लिहिले होते. तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणीचा मजकूर उपस्थिकांचे लक्ष वेधून घेत होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT