नाशिक : सतीश डोंगरे
शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी उभे आयुष्य खर्ची घालणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी केवळ शोषित-वंचितांनीच गर्दी केली नव्हती, तर समाजातील प्रत्येक घटक अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. ज्या नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेबांना 2 मार्च 1930 रोजी अस्पृश्यांचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करावा लागला, त्याच नाशिकमधील अनेक ब्राह्मण डॉ. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याच्या नोंदी निफाडमधील त्यांचे अंगरक्षक डॉ. भीमराव चांगदेव साळुंखे यांनी लिहिलेल्या दस्तावेजामध्ये आढळतात.
दिल्लीतील 26 अलीपूर रोड या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 डिसेंबर 1956 रोजी मध्यरात्री झोपेतच अखेरचा श्वास घेतला. 6 डिसेंबरची सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजाडली. निधनाची वार्ता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय), यूएनआय, आकाशवाणी केंद्र तसेच सरकारी खात्यांना फोन करून कळवताच देशभर पसरली. त्यावेळी त्यांचे पार्थिव नागपूरमार्गे मुंबईला आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाशेजारी माईसाहेब आंबेडकर, भदन्त आनंद कौसल्यायन, सोहनलाल शास्त्री, नानकचंद रट्टू आदी बसलेले होते. देशाच्या कानाकोपर्यातून त्यांच्या अंत्ययात्रेसाठी लोक येत असताना, नाशिकमधूनदेखील मोठ्या संख्येने लोक मुंबईत दाखल झाले होते. ज्यात ब्राह्मणांचाही समावेश असल्याच्या नोंदी डॉ. भीमराव साळुंखे यांनी लिहिलेल्या दस्तावेजामध्ये आढळून येतात.
जेव्हा बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता, तेव्हा काही पुरोहित बाबासाहेबांच्या बाजूने सत्याग्रहात सहभागी झाले होते. जातीने नव्हे, तर विचाराने प्रेरित होऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे या सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविला होता. त्यातील देशपांडे नामक पुरोहिताला प्रखर विरोध केला गेला. मात्र, ते अखेरपर्यंत बाबासाहेबांसोबत राहिले. याशिवाय सबनीस, गद्रे, चित्रे, टिपणीस, सहस्रबुद्धे यांचे बाबासाहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. या सर्व मंडळींनी त्यावेळी बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबई गाठली होती.
बाबासाहेबांनी अनेकदा नाशिकला भेट दिल्याच्या नोंदी आहेत. 1937 मध्ये रेल्वे स्टेशनजवळील बौद्धविहाराची स्थापना त्यांनी केली. बाबासाहेब 15 मे 1947 रोजी रेल्वे स्टेशनवर पंजाब मेल या रेल्वेने आले होते. रेल्वे स्टेशनजवळ असणार्या बौद्ध स्मारक येथे त्यांनी वास्तव्य केले होते. दि. 20 मे 1947 रोजी प्रेस येथे वेतनवाढीसंबंधी विचारविनिमय सभा त्यांनी घेतली होती. डॉ. बाबासाहेब नाशिक रोडला आल्यानंतर त्यांचे राहण्याचे ठिकाण हे चळवळीचे केंद्र समजले जात. या ठिकाणी चळवळीच्या गीताबरोबरच जलसा आणि शाहिरी कार्यक्रम होत असे. 23 मे 1947 रोजी डॉ. बाबासाहेबांनी प्रेस गिरणी कामगार युनियनची सभा प्रेसच्या मैदानावर घेतली होती. ही सभा निर्णायक झाली होती. या सभेला शांताबाई दाणी, जलसाकार शाहीर रामचंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती. डिस्टिलरी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 मे 1947 रोजी सायंकाळी 6 वाजता वंचित आणि चळवळीतील कार्यकर्त्यांची सभा घेतली होती. सभेला 400 ते 500 कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब हे देवळाली कॅम्पलाही येऊन गेल्याचा संदर्भ आहे. त्यावेळी डॉ. बाबासाहेब यांच्याबरोबर सहस्रबुद्धे शास्त्री हे त्यांचे अनुयायी राहात असत.
माझे आजोबा कॅप्टन भीमराव साळुंखे बाबासाहेबांचे अंगरक्षक होते. त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या अनेक दस्तावेजांमध्ये बाबासाहेब नाशिकला आल्याचा संदर्भ आहे. त्यावेळी नाशिकमधील अनेक ब्राह्मण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झाले होते.भीमराज प्रताप साळुंखे, नाशिक.