नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे दोनदिवसीय अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२५) छत्रपती संभाजीनगर रोडवरील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे होत आहे. सोहळ्याला महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री तसेच मंत्री, खासदार, आमदार संत-महंत, पुजारी उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी (दि.२५ ) सकाळी ८.३० वाजता पालखी सोहळा व ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, अधिवेशनीय सभागृह व ग्रंथनगरीचे उद्घाटन होईल. सकाळी १० ते दुपारी १२ या दरम्यान अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री तसेच अन्य नेते गण व संतगणांच्या प्रमुख उपस्थितीत महंत मोहनराज कारंजेकर बाबा यांचा अ. भा. महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार समारंभ होईल. रात्री ९ ते १० व्दितीय सत्रामध्ये महानुभाव मराठी साहित्य व साहित्यिकांच्या विचारांची अमृततुल्य मेजवानी अनुभवयास येणार आहे. रविवारी ( दि.२६ ) स.७ वा. भगवद्गीता पाठ पारायण, स.९ वा. महानुभाव परिषदेच्या समारोप सत्रात स्वागत समारंभ, संतपूजन प्रास्ताविक, मावळत्या अध्यक्षांचे विचार मांडले जातील. दुपारी ११.४५ धर्मसभा आभार व निरोप समारंभ होईल. याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आदी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात महंत सुकेणकर बाबा महानुभाव, महंत चिरडे बाबा महानुभाव आणि कृष्णराज बाबा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप, नाशिकरोड व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड, महानुभाव परिषदेचे राज्याध्यक्ष प्रकाशशेठ ननावरे, मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, सुभाष पावडे, प्रभाकर भोजने, उदय सांगळे, अनिल जाधव, किरण मते आदींच्या साहाय्याने आयोजित करण्यात आले आहे.