Travels Bus Pudhari
नाशिक

Nashik Bus Stand | महामार्ग बसस्थानकाला खासगी ट्रॅव्हल्सचा विळखा; मनपाच्या जागेवर बेकायदा पार्किंगमुळे एसटी प्रशासन आक्रमक

Nashik Bus Stand | मनपाच्या जागेवर बेकायदा पार्किंग; एसटी महामंडळाची कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

शहरातील मुंबई नाका परिसरातील महामार्ग बसस्थानकाला खासगी ट्रॅव्हल्सचा विळखा पडला असून, महापालिकेच्या मालकीच्या जागेवर खासगी बसेसचे बेकायदा पार्किंग सुरू आहे. विशेष म्हणजे, एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसर खासगी वाहनांना प्रवासी चढविण्यास-उत्तरविण्यास मनाई असतानाही नियमांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे.

न्यायालयीन आदेश आणि प्रशासकीय निर्देशांनाही केराची टोपली दाखवली जात असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बसेसचे पार्किंग तातडीने हटवून त्यांची व्यवस्था तपोवन येथे करावी आणि महापालिकेची जागा एसटी महामंडळाला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकाला लागून असलेल्या महापालिकेच्या जागेवर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसचा तळ पडला आहे. या ठिकाणी बसेस उभा करण्याबरोबरच प्रवाशांची चढ-उतार केली जात असल्याने एसटीच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सकडून बसस्थानक परिसराचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी होत असल्याने एसटी महामंडळाच्या व्यवस्थेवर आणि उत्पन्नारवरही परिणाम होत असल्याचे महामंडळाने पत्रात स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ ऑक्टोबर २००२ रोजी एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसर खासगी वाहनांना प्रवासी चढविण्यास अथवा उतरविण्यास मनाई करणारे निर्देश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनानेही अनधिकृत पार्किंगविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही खासगी बसेसवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, आदेशांची अंमलबजावणी कागदावर राहिल्याचे महामार्ग बसस्थानक परिसरातील परिस्थितीवरून दिसून येत आहे.

तपोवनात पर्यायी जागा, तरी महामार्गावर मुक्काम!

खासगी बसेसच्या पार्किंगसाठी तपोवन येथे पर्यायी व्यवस्था उपलब्ध असतानाही महामार्ग बसस्थानकाजवळील महापालिकेच्या जागेवर खासगी बसेसचा ताबा कायम आहे. या बसेस तपोवन येथे स्थलांतरित करून संबंधित जागा एसटी महामंडळाला द्यावी,

अशी मागणी पूर्वही करण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे खासगी बसचालकांचे फावले असून, एसटी महामंडळाला मात्र विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सिंहस्थ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची कसोटी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि प्रवासी दाखल होणार आहेत. शहरातील प्रमुख बसस्थानक परिसरच खासगी बसेसचे अनधिकृत पार्किंग सुरू राहिल्यास वाहतूक नियोजनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

यामुळे सिंहस्थापूर्वी या प्रश्नाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. विभाग नियंत्रकांनी १६ नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून खासगी बसेसचे पार्किंग तपोवन येथे स्थलांतरित करण्यासह महापालिकेची जागा एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT