नाशिक : आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून इगतपुरी, वाडीवर्हे, दिंडोरी या भागात आदिवासींच्या जमिनी लुबाडण्याचा नवीन गोरखधंदा सुरु झाला आहे. नोकरी, राजकीय पदे आणि जमिनी लुबाडण्याचा हा प्रकार आदिवासी विकास परिषद खपवून घेणार नाही. आमचा प्रेमाला विरोध नाही मात्र मुलींना फसवून जर कोणी आदिवासींच्या हक्काच्या वनजमिनी लुटत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आदिवासी विकास परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष फग्गनसिंह कुलस्थे यांनी दिला आहे.
आदिवासी विकास परिषदेचे तत्कालिन कार्यकारी अध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या निधनानंतर या पदावर विराजमान झालेल्या फग्गनसिंह कुलस्थे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा सुरु केला आहे. दौर्यांतर्गत आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव, सारिका सोनवणे, संदीप जाधव, केशव किराणा, संतोष आत्राम, गणेश गवळी आदी उपस्थित होते.
कुलस्थे म्हणाले, बनावट कागदपत्रांच्या आधारे आदिवासी जमिनींवर घाला घालण्याचे काम सुरु आहे. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यासंदर्भात आम्ही आदिवासी विकासमंत्र्यांच्या संपर्कात आहोत. मंत्री महोदयांशी याविषयावर चर्चा सुरु असून आदिवासींची लुबाडणूक करणार्यांवर लवकरच कारवाई सुरु होणार आहे. लकी जाधव यांनी सांगितले की, विकास परिषदेच्या प्रयत्नांमुळे सुमारे साडेआठ हजार आदिवासी उमेदवारांना पेसाभरतीचा लाभ होणार आहे.
सुप्रीम कोर्टात निर्णयासाठी पेसा भरती रखडली असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विकास परिषद प्रयत्न करेल. आदिवासींच्या गैर आदिवासींकडे असलेल्या जमिनी आदिवासींना परत मिळाव्यात यासाठीही लढा सुरु असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.