Londhe Crime Case : लोंढे पित्रा-पुत्रावर आणखी एक गुन्हा दाखल Pudhari News Network
नाशिक

Londhe Crime Case : लोंढे पित्रा-पुत्रावर आणखी एक गुन्हा दाखल

अडचणीत वाढ : फसवणुकीसह, जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा नाना लोंढे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये लोंढे पिता-पुत्र कारागृहात असून, आता त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यामुळे पिता-पुत्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह जिवे मारण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

विनोद सुखलाल मुनोत (५०, रा. मनमाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रकाश लोंढे आणि त्याचे साथीदार केतन भुजबळ, रूपेश पवार, गौरव देशमुख, प्रशांत धनेधर, नाना लोंढे व अन्य तीन ते चार व्यक्तींनी योगेश जाधव यांची ३० लाख रुपयांची फसवणूक केली. गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २१ एप्रिल २०१९ रोजी रात्री 8 च्या सुमारास सातपूर एमआयडीसी येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी हे मेडिकल व्यावसायिक असून, संशयितांनी फिर्यादीच्या मेडिकल दुकानात येत प्रकाश लोंढे यांना निवडणुकीत पैसे वाटप करण्यासाठी कमी दराच्या नोटा हव्या असल्याची मागणी केली. या नोटांऐवजी जास्त दराच्या नोटा देणार असल्याचे व मूळ रकमेच्या १० टक्के जास्त रक्कम देणार असल्याचे आमिष दाखवले. संशयित केतन भुजबळने पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एमएच १५, एफएन १२३७) प्रकाश लोंढे सातपूर एमआयडीसीतून जात असताना त्यांनी फिर्यादीला बोलावून घेतले. त्या ठिकाणी संशयित केतन भुजबळने गावठी कट्टा फिर्यादीच्या कानाला लावत जिवे मारण्याची धमकी दिली.

संशयित रूपेश पवारने चाकू काढत योगेश जाधवला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी दोघांनाही धक्काबुक्की, मारहाण करत फिर्यादीच्या हातातील ३० लाखांची पिशवी हिसकावून घेतली. संशयित गौरव देशमुखने फिर्यादी व योगेश जाधवचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर संशयित भुजबळ व पवार यांनी कारचे दोन्ही बाजुंचे दरवाजे उघडून फिर्यादी व योगेश जाधव यांना लाथ मारत कारमधून ढकलून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब प्रकाश लोंढे याचा मुलगा नाना लोंढे याला समजताच त्यानेही फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बटुळे तपास करीत आहेत.

Nashik Latest News

कारागृहातील मुक्काम वाढणार

प्रकाश लोंढेवर एकापाठोपाठ गुन्हे दाखल होत असल्यामुळे त्याच्या अडचणी वाढत आहेत. सध्या लोंढे नाशिकरोड कारागृहात असून, या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून त्याचा पुन्हा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातत्याने गुन्हे दाखल होत असल्यामुळे लोंढे याचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT