नाशिक

Loksabha Election 2024 | ‘मनसे’ फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पक्ष स्थापनेनंतर येत्या ९ तारखेला पहिल्यांदा नाशिकमध्ये पक्षाचा राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिकमध्ये दोन दिवस मुक्काम असतील. लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election 2024) दृष्टीने राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे हे दिशा देणार असल्याने या मेळाव्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

अवघ्या दहा दिवसांमध्ये लाेकसभा निवडणूकांची घोषणा होणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गजांनी नाशिकमध्ये हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे. ज्या नाशिकमध्ये १८ वर्षापूर्वी ठाकरे यांनी मनसे पक्षाची घोषणा केली, त्याच कुंभनगरीत पक्षाचा पहिलावहिला राज्यस्तरीय वर्धापन दिन पार पडणार आहे.

मनसेच्या (MNS) राजगड कार्यालयामध्ये मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात सोमवारी (दि.४) पत्रकार परिषद पार पडली. पक्ष शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी तयारीबद्दल माहिती देताना ७ मार्चला सायंकाळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत केले जाईल. ८ मार्चला सकाळी नऊ वाजता पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते आरती होणार आहे. तर ९ मार्चला भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा होईल. या मेळाव्यात राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे हे लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करतील. यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, धिरज भोसले, नितीन माळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते.

आदेशाचे पालन करु
आगामी लोकसभेबरोबर होऊ घातलेल्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी पक्षाचे संघटन मजूबत केले जात असल्याचे सुदाम कोंबडे यांनी सांगितले. लोकसभेसाठी पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असली तरी राज ठाकरे देतील त्या आदेशाचे तंतोतत पालन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेळाव्याच्या माध्यमातून मनसेच्या काळातील रिंग राेड, बोटॅनिकल गार्डन, वाहत्या पाण्यावरील १०० फुटी कारंजा, होळकर पुलावरील वॉटर कर्टन यासह अन्य कामांना उजाळा दिला जाणार आहे.

SCROLL FOR NEXT