नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी गोदावरीचे नदीपात्र कोरडे करण्यात आले असतानाही गांधी तलावातील काँक्रीटीकरणातून बाहेर पडणाऱ्या जिवंत झऱ्यांमुळे कावडधारक भाविकांना दिलासा मिळाला आहे. या झऱ्यामधून ओंजलीने पाणी भरून भाविक कावडी तयार करत असून, हे पवित्र जल वणी येथील सप्तशृंगी देवीच्या जलाभिषेकासाठी पायी प्रवास करून घेऊन जात आहेत.
विशेष म्हणजे, गोदावरीचे नदीपात्र कोरडे असताना झऱ्यामधून मिळणाऱ्या पाण्यामुळे कावड यात्रेची धार्मिक परंपरा सुरू ठेवणे कावडधारक भाविकांना शक्य झाले आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीचे पाणी कावडीने नेण्याची परंपरा अनेक भाविक जपत आहेत. नाशिकपासून सप्तशृंगगडपर्यंतचा प्रवास पायी पूर्ण करत हे भाविक देवीच्या अभिषेकासाठी जल अर्पण करतात.
या पाण्याचा वापर जलाभिषेकासाठी धार्मिक पूजाविधीसाठी केला जातो. सध्या नदीपात्रात पाणी नसल्याने कावड भरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गांधी तलाव परिसर काँक्रीटीकरणातून काही ठिकाणी झऱ्यांचे पाणी बाहेर पडत असल्याने भाविकांना कावड भरण्यासाठी जल उपलब्ध होत आहे.
गोदावरी नदीपात्रातील विविध भागात करण्यात आलेल्या सीमेंट काँक्रीटीकरणामुळे नैसर्गिक झरे झाकल्याची स्थिती आहे. मात्र, गांधी तलावातील काही ठिकाणी काँक्रीटीमधून झिरपणारे पाणी दिसून येत आहे. काही ठिकाणी काँक्रीटीमधून चक्क पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे. याच ठिकाणी भाविक हाताच्या ओंजलीने पाणी गोळा करून कावड भरत आहेत. त्यानंतर श्रद्धेने पायी प्रवास करत हे जल सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण केले जात आहे.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे गोदावरीचे पात्र कोरडे पडले असताना, या जिवंत झऱ्यामधून मिळणारे पाणी कावडधारकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. गोदावरीशी जोडलेली श्रद्धा, कावड यात्रेची परंपरा आणि सप्तशृंगी देवीच्या जलाभिषेकाची भक्तिभावाने जपली जाणारी प्रथा यांचे दर्शन गांधी तलाव परिसर घडत आहे.