राज्यात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या वर्षभरातच कुष्ठरोगाचे २० हजार नवे रुग्ण आढळले आहेत.  file photo
नाशिक

Leprosy | सावधान, राज्यात कुष्ठरोग बळावतोय ! वर्षभरातच आढळले २० हजार नवे रुग्ण

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : आसिफ सय्यद
Leprosy कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासनपातळीवर राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना फारशा परिणामकारक ठरत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या वर्षभरातच कुष्ठरोगाचे २० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. २०२२-२३ या वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आढळलेल्या कुष्ठरुग्णांची संख्या १४१ ने अधिक असून प्रति दहा हजार लोकसंख्येमागे असलेले कुष्ठरुग्णांचे १.०३ प्रमाण १.१६ वर गेले आहे. कुष्ठरुग्णांचे वाढते प्रमाण शासनाच्या आरोग्य विभागासाठी नवे आव्हान ठरले आहे.

कुष्ठरोग एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्‍या चेता बाधित होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास डोळे, यकृत, प्लीहा, स्नायू आणि अस्थिमज्जा यांवरही परिणाम होऊ शकतो. कुष्ठरोग हा प्राणघातक रोग नाही. या रोगावर वेळीच उपचार न केल्यास संसर्गामुळे बाधित व्यक्तीत शारीरिक व्यंग येऊन ती विकलांग होते. त्यामुळे कुष्ठरोगी हे भीती आणि गैरसमजुती यांचे बळी ठरतात. राज्यात २०१८-१९ पर्यंत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यशस्वी ठरल्याचे सकारात्मक चित्र होते. त्यानंतर मात्र या आजाराचा प्रादुर्भाव वाढत गेला. २०२२-२३ या आर्थिक वर्षात नव्याने कुष्ठरोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १९,८६० इतकी होती. कुष्ठरोगाचे प्रमाण प्रति दहा हजार लोकसंख्येमागे १.०३ होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात २०,००१ नवे कुष्ठरोगी आढळले. कुष्ठरोगाचे प्रमाण प्रति दहा हजार लोकसंख्येमागे १.१६ इतके झाले आहे. या आजाराचा संसंर्ग वाढू नये यासाठी निर्मूलन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज यातून अधोरेखित झाली आहे.

कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे

त्वचेवर पांढरा किंवा लाल चट्टा दिसतो, त्वचेची संवेदनक्षमता कमी होते, चेता जाड दिसतात. शरीराच्या विविध भागांवर गाठी दिसून येतात. वेळीच उपचार न केल्यास चेतांची गंभीर हानी होते. हात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो. परिणामी बोटे आणि पंजा आतील बाजूला वळतात. मायक्रोबॅक्टिरियम लेप्री डोळ्यात शिरल्यास वेदनामय दाह निर्माण होतो आणि तीव्रता वाढल्यास अंधत्व येऊ शकते.

कुष्ठरोगाचे दोन मुख्य प्रकार

(१) ग्रंथिसदृश (ट्युबरक्युलॉइड) आणि (२) कुष्ठार्बुदीय (लेप्रोमॅटस). पहिल्या प्रकारच्या बहुतांशी रुग्णांमध्ये शरीरावर एक किवा मोजकेच चट्टे आणि कमी संख्येने जीवाणू असतात. हा प्रकार प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींतच दिसतो. दुसऱ्या प्रकारच्या कुष्ठरोगाने बाधित बहुतांशी रुग्णांच्या शरीरावर खूप चट्टे आणि त्याच्या ऊतींमध्ये लक्षावधी जीवाणू आढळतात. हा प्रकार फार सांसर्गिक असतो.

कुष्ठरोगावरील उपचार

आतापर्यंत कुष्ठरोगाला प्रतिबंध करणारी कोणतीही प्रभावी व खात्रीलायक लस विकसित झालेली नाही. मात्र काही विशिष्ट औषधे कुष्ठरोगाची वाढ थांबवितात आणि रुग्णाला वेगाने 'असांसर्गिक' बनवितात. १९४० च्या दशकापासून कुष्ठरोगावर उपचार करण्यासाठी डॅप्सोन नावाचे सल्फा औषध वापरले जात आहे.

नाशिकमध्ये ९१६ नवे कुष्ठरोगी

नाशिक जिल्ह्यात २०२३-२४मध्ये ९१६ नवे कुष्ठरूग्ण आढळले तर या आर्थिक वर्षात९०४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात नाशिक शहरातील रुग्णांचा आकडा १३६ होता. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या नऊ महिन्यात जिल्ह्यात ३७० नवे कुष्ठरोगी आढळून आले आहेत. यात शहरातील ५७ रुग्णांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT