Nashik News 
नाशिक

Nashik News | निफाड तालुक्यामध्ये दोन बिबटे जेरबंद

धानोरेत ९ वर्षांचा बिबट्या, शिवडीत ४ वर्षांची मादी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

निफाड : तालुक्यातील धानोरे शिवारात नर, तर शिवडी शिवारात मादी बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले. दोन्ही बिबट्यांना निफाडच्या रोपवाटिकेत आणण्यात आले असून, तपासणीनंतर त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात येणार आहे.

तालुक्यातील धानोरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी धोक्याचा ठरत होता. पहाटे व सायंकाळच्या सुमारास अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने संजय फकीरराव गायकवाड यांच्या शेतात पिंजरा लावला होता. गुरुवारी (दि. २९) पहाटे अन्नाच्या शोधात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

बिबट्या पकडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय दोंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेत पुढील तपासणीसाठी निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत हलवले. हा सुमारे नऊ वर्षे वयाचा नर बिबट्या आहे.

दुसऱ्या घटनेत शिवडी परिसरातील नितीन केदू क्षीरसागर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास ४ ते ५ वर्षे वयाची बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे शिवडी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. गुरुवारी पहाटे अन्नाच्या शोधात आलेली मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली. ही बाब सकाळी लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय दोंदे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद केलेल्या मादी बिबट्याला सुरक्षितरीत्या रेस्क्यू करत निफाडच्या शासकीय रोपवाटिकेत हलवण्यात आले. तिथे तिची वैद्यकीय तपासणी करत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे सध्या धोका टळला असला, तरी परिसरात अन्य बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाताना खबरदारी बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT