बिबट्याने जनावरांच्या गोठ्यावर हल्ला करून कालवड उचलून नेली.  Pudhari News Network
नाशिक

Leopard Scare : हरसूले गावात बिबट्याचा थरार

चार तास दहशत, कालवड फस्त

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर ( नाशिक ) : सिन्नर तालुक्यातील हरसूले गावात मंगळवारी (दि. 19) रात्री दहापासून पहाटे अडीच वाजेपर्यंत बिबट्याने थैमान घातले. सिन्नर-घोटी महामार्गालगतच्या या गावात बिबट्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

रात्री दहाच्या सुमारास नामदेव शिंदे यांच्या घराजवळील कुत्र्याचे पिल्लू बिबट्याने उचलून नेले. त्यानंतर साडेदहा वाजता भारत शिंदे यांच्या वस्तीकडे मोर्चा वळवून पाळीव कुत्र्यास ठार केले. दरम्यान, माजी सरपंच रामचंद्र शिंदे यांच्या घरासमोरील जनावरांच्या गोठ्यावर हल्ला करून १५-१६ महिन्यांची कालवड उचलून नेली. शेतात पिकांमध्ये बिबट्याचे डोळे चमकताना दिसल्याने त्यांनी इतर शेतकऱ्यांना मदतीसाठी पाचारण केले.

रामचंद्र शिंदे, नारायण शिंदे, सुयोग शिंदे, मंगेश केदार, हरी पवार, देवेश शिंदे, रवींद्र शिंदे आदींनी बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले. काहींनी फटाके फोडले तर काहींनी दगडफेक केली. मात्र बिबट्या तब्बल चार तास दबा धरून राहिला आणि शेवटी कालवडीचा बळी घेत पिकातून पसार झाला. या घटनेमुळे हरसूले परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून शेतकरी सुरक्षिततेबाबत मागणी करीत आहेत.

इंदिरानगरमध्ये बिबट्याकडून गाय फस्त; वनविभागाकडून आठ तास सर्च ऑपरेशन

इंदिरानगर येथील रंगरेज मळे परिसरातील नर्सिंग कॉलेजजवळ एका गायीला बिबट्याने ठार केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन शोध मोहिम राबवत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावल्याचे क्षेत्रीय वनअधिकारी सुमित निर्मळ यांनी सांगितले.

नाशिकरोड भागातील वडनेर दुमाला परिसरात ८ ऑगस्टला तीन वर्षीय बालकाला बिबट्याने उचलून नेले. पिंजरा लावूनही बिबट्या पिंजर्‍याकडे फिरकत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (दि.20) नाशिक पश्चिमच्या कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदविला होता. ही घटना ताजी असतानाच रात्री इंदिरानगर परिसरातील रंगरेज मळा भागात एका जर्सी गायीवर बिबट्याने हल्ला करीत तिला ठार केले. वडाळा गावातील सेंट सादिक स्कुल अन पांडवनगरी परिसरातील नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली. अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पंजांचे ठसे घेतले. रात्रभर वनअधिकार्‍यांनी वडाळागाव, श्रद्धा विहार, नर्सिंग कॉलेज, पांडव नगरी परिसरात तब्बल आठ तासांची शोध मोहिम राबवत खबरदारी म्हणून पिंजरा लावला आहे. वडनेर, वडनेर गेट, वडाळा, लष्करी विभाग, इंदिरानगर, पाथर्डी आदी भागात वनाधिकारी प्रवीण रत्नपारखी, अनिल आहेर, मोहन लकडे, शरद अस्वले यांनी शोध मोहिम राबवली. माजी नगरसेवक श्याम बडोदे यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांसोबर पाहणी दौरा केला.

कुत्रा, तरसाचे पंजे आढळल्याचा दावा

ठार झालेल्या गाईजवळ कुत्रा आणि तरसाच्या पायाचे ठसे आढळल्याचा दावा वनविभागाने केला आहे. परिसरात घबराटीचे वातावरण असून गाईवर बिबट्यानेच हल्ला केल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT