बिबट्याचे दर्शन file photo
नाशिक

Leopard News Nashik | मखमलाबाद शिवारात बिबट्याचे दर्शन

नागरिकांनी सावध राहण्याचे वनविभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : उन्हाळा सुरू असल्याने सध्या बिबट्यांनी शहराकडे आपला मोर्चा वळविला आहे. शहरातील मखमलाबाद शिवारात गत दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे.

मखमलाबाद शिवारातील ओमकार पिंगळे यांच्या घरासमोर रात्री 12 च्या सुमारास बिबट्याचा वावर आढळून आला. पिंगळे यांनी घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बिबट्याचे फुटेज कैद झाले आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्यावेळी फिरणार्‍या बिबट्याला त्वरीत पिंजर्‍यात कैद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या उन्हाळा सुरु झाल्याने तापमान चाळीशीच्या पार पोहोचले आहे. उकाडा जाणवत असल्याने तहान भागविण्यासाठी प्राणी शहराकडे धाव घेत आहेत. मानवाने जंगलांवर अतिक्रमण केल्याने जंगली प्राणी आता शिकारीसाठी अन पाण्यासाठी शहराकडे येत आहेत. नाशिक परिसरात शेती अधिक प्रमाणात करण्यात येते. यामुळे बिबट्यांना शेतात लपणे सोईचे होते. बिबटे रात्री ऊसाच्या पिकात लपतात तर रात्री कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, वासरे यांची शिकार करण्यासाठी बिबटे बाहेर पडतात.

अनेकठिकाणी वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजले लावण्यात आले असून पकडल्यानंतर त्यांना म्हसरुळ येथील रेस्क्यु सेंटर येथे आणले जाते, तेथून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानूसार जंगलात सोडले जाते.

तहान भागविण्यासाठी शहराकडे धाव

उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे पाणी मिळणे दुरापास्त होते. अशावेळी पाण्याच्या शोधार्थ बिबटे शहराकडे येत आहेत. दिवसा शहरात वर्दळ असल्याने अन जीवाला धोका असल्याने बिबटे आडोशाला किंवा शेतात लपून बसतात तर रात्रीच्यावेळी शिकारीसाठी बाहेर पडतात. अशावेळी नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

शेतकर्‍याने एकट्याने शेतात जाऊ नये

रात्रीच्या वेळी शेतात जाताना हातात लाठ्या काठ्या घेऊन जावे, मोठ्या बॅटर्‍या सोबत ठेवाव्यात. एकट्या दुकट्याने शेतात न जाता ग्रुपने जावे. काठीला घुंगरू लावलेले असल्यास उत्तम. बिबट्या समोर आल्यास हात उंच करावे. आपल्यापेक्षा छोट्या प्राण्यावरच बिबट्या हल्ला करत असल्याने बिबट्यापेक्षा आपण मोठे आहोत हे बिबट्याला भासवावे. जेणेकरुन तो पळ काढेल. बिबट्यासमोर पळून जाण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा तो पाठलागा करेल. बिबट्या समोर आल्यास धीराने तोंड द्यावे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी बाहेर झोपू नये. लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये. पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT