मनमाड (नाशिक): शहरातील मध्यवर्ती शीख मळ्यात काही दिवसांपूर्वी वन विभागाने एक बिबट्या जेरबंद केला होता. मात्र, केवळ चार दिवसांतच याच परिसरात दुसऱ्या बिबट्याने प्रवेश केल्याचे समोर आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मळ्यात पुन्हा एकदा पिंजरा लावला आहे.
शहरातील गुरुद्वाराच्या पाठीमागील शीख मळ्यात चार दिवसांपूर्वी दीड वर्षाच्या बिबट्याचा शिरकाव झाला होता. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तो बिबट्या अडकल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गुरुवारी रात्री पुन्हा याच मळ्यात दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाले. वनरक्षक सोनाली वाघ, इरफान सय्यद, वनपाल गोपाल राठोड, भाऊसाहेब झाल्टे आणि योगेश कुंजाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पिंजरा लावला. त्यात बिबट्या केव्हा अडकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निफाड, येवला, चांदवड व नांदगाव परिसरात बिबटे आढळत असताना, मात्र मनमाड शहरात प्रथमच बिबट्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात घनदाट जंगल नसताना बिबटे कुठून येतात, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. काहींच्या मते, इतर भागांतून पकडलेले बिबटे मनमाडच्या हद्दीत सोडले जात असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.शहरात आधीच मोकाट कुत्रे व जनावरांचा त्रास वाढलेला आहे. श्वानदंशामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत आता बिबट्याचा धोका उद्भवल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.