देवळा (नाशिक) : तालुक्यातील विठेवाडी येथे बंद अवस्थेत असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात गेल्या महिन्याभरापासून बिबट्यांच्या हालचालींमुळे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक भयभीत होते.
मंगळवार (दि.9) रोजी दुपारी साधारण तीन ते चारच्या दरम्यान, कारखान्याचे सुरक्षा इंचार्ज कैलास गरुड परिसराची पाहणी करत असताना त्यांनी कारखाना परिसरात ठेवलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. काही वेळातच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी प्रसाद पाटील, वनरक्षक विजय पगार, गोविंद पवार, नामदेव ठाकरे, सुवर्णा इकडे आणि भूपेंद्र राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी आणि पुढील संरक्षणात्मक प्रक्रिया करण्यासाठी त्याला देवळा वनविभागाकडे हलवण्यात आले आहे. कारखाना परिसरात आणखी पाच ते सहा बिबटे असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.