Leopard News
बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी द्या, नाशिकमधील आमदाराची मागणी fIle photo
नाशिक

Leopard News | बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी द्या, नाशिकमधील 'या' आमदाराची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यात बिबट्यांची संख्या वाढली असून, त्यांच्याकडून पाळीव प्राणी व नागरिकांवर हल्ल्याच्या घटना ठिकठिकाणी सातत्याने घडत आहेत. यात अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. विशेषत: लहान मुलांना धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी पत्रव्यवहार करीत वनविभागाने पकडलेल्या बिबट्यांच्या नसबंदीकडे लक्ष वेधले आहे. त्याअंतर्गत बिबट्यांच्या नसबंदी परवानगीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठविण्याची मागणी केली आहे.

राज्यात बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, दाट लोकवस्ती असलेल्या तसेच महानगरातही वावर दिसून येत आहे. बिबट्यांनी शेतकरी, सर्वसामान्य तसेच लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. बहुतांश मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या असून, यातून नागरी जिवाला धोका निर्माण झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला. यामुळे दहशत पसरून ग्रामीण भागातील शेतकरी शेतात काम करायला जाण्यास धजावत नसल्याकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधले आहे. ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकणाऱ्या बिबट्यांच्या नसबंदीची गरज असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय वनमंत्र्यांचीही घेतली होती भेट

याच संदर्भात आ. तांबे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत, बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. याप्रसंगी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र शासनाने याबाबतचा प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करून मंजुरी देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. याविषयी वनमंत्री मुनगंटीवार यांना अवगत करत, शासनाने तातडीने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी आ. तांबेंनी केली.

SCROLL FOR NEXT