Leopard attack Pudhari
नाशिक

दिंडोरी हादरले ! बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; परिसरात दहशतीचे सावट

या हल्ल्यामुळे पिंपळणारे आणि आसपासच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी: तालुक्यातील पिंपळणारे परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा जीवघेणा ठरला आहे. शुक्रवारी (दि.३) सकाळी वासरू बांधण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या भीषण घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब साळवे (वय ६९) हे शुक्रवारी सकाळी ८:३० च्या सुमारास आपल्या गोठ्यात वासरू बांधण्याचे काम करत होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. साळवे यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. लोकांचा वाढता गोंधळ पाहून बिबट्याने तेथून पळ काढला, मात्र या हल्ल्यात साळवे गंभीर जखमी झाले होते.

उपचारापूर्वीच मृत्यू

रक्तरंजित अवस्थेत असलेल्या साळवे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना 'मृत' घोषित केले. या घटनेमुळे साळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोकाकुल वातावरण आहे.

प्रशासकीय कारवाई आणि उपाययोजना

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामस्थांच्या वाढत्या रोषानंतर वनविभागाने तत्काळ पावले उचलत परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. आम्ही परिसरात गस्त वाढवली असून बिबट्याला पकडण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी शेतात जाताना समूहाने जावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे पिंपळणारे आणि आसपासच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतमजुरांनी शेतात जाण्यास धास्ती घेतली आहे. दरम्यान, मृत गुलाब साळवे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT