नाशिक : शेतात काम करताना असलेली भीती असो वा रात्री मानवी वस्तीत दिसणाऱ्या बिबट्यामुळे निर्माण होणारी दहशत नाशिककरांच्या या चिंतेवर आता ठोस उपाययोजना होणार आहे. बिबट्या मानव संघर्ष कायमस्वरुपी थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'एकात्मिक कृती आराखडा' तयार केला आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशस्वी व्यवस्थापन पद्धत नाशिकमध्ये राबवली जाणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी नाशिक, अहिल्यानगर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्याशी चर्चा केली. या योजनेत संपूर्ण जिल्ह्याचे हाय रिस्क झोन आणि मिडियम रिस्क झोन असे वैज्ञानिक वर्गीकरण करण्यात येणार आहे. जिथे धोका अधिक तिथे अत्याधुनिक यंत्रणा, मध्यम धोक्याच्या भागात प्रतिबंधात्मक उपाय राबवले जाणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या जास्त असूनही मानवी संघर्ष कमी आहे.
यामागील नियोजन, जलद प्रतिसाद पथके आणि जनजागृती या त्रिसूत्रीचा अनुभव नाशिकसाठी वापरला जाणार आहे. उद्दिष्ट 'बिबट्यामुक्त' नव्हे, तर 'बिबट्या संघर्षमुक्त नाशिक' असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ही मोहिम उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर व राकेश सेपट राबवणार आहे. प्रशासनाची ही नियोजनबद्ध पावले आणि वन विभागाचे शास्त्रीय धोरणामुळे नाशिकमध्ये मानवी सुरक्षितता व वन्यजीव संवर्धनाचा समतोल साधला जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
असा असेल आराखडा
वैज्ञानिक पद्धतीने सुरक्षित रेस्क्यू मोहीम
जखमी बिबट्यांसाठी उपचार व बचाव केंद्र
वन्यजीव पुनर्वसन आणि नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापना
अफवांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती
पर्यावरण, पर्यटन आणि विकास
सार्वजनिक सुरक्षिततेसह जबाबदार इको टुरिझमचा विचार
भोरगिरी परिसरात वृक्षारोपण मोहिम
सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर जादा वृक्षलागवड