देवळा ( दहिवड, नाशिक) : तालुक्यातील दहिवड येथील शेतात बिबट्याची बछडे आढळून आल्याने शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी तत्काळ भेट देऊन नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.
दहिवड येथे शुक्रवारी (दि. 26) सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतकरी दादाजी दगा देवरे यांच्या शेतालगतच्या पडिक क्षेत्रात मोठमोठी झाडे झुडपे वाढली आहेत. त्या ठिकाणी विहिरीसारखा एक खोल खड्डा असून त्या खड्ड्यात तीन बछडे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामधील एक बछडा नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क करत याची माहिती दिली. नागरिकांनी रात्री एकटे बाहेर पडू नये. जनावरे बांधीव शेडमध्ये बांधावी. घराबाहेर दिवे चालू ठेवावीत. लहान मुले व वृद्धांना शक्यतो रात्री बाहेर येऊ देऊ नये. आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांनी सावध राहावे. बिबट्या मादी त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. वनविभागाकडून तत्काळ पिंजरा लावून मादीला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. उमराणे येथील वनपाल देविदास चौधरी, विजय पगार, नामदेव ठाकरे, गोपाळ साबळे, ताराचंद देवरे, ईश्वर ठाकरे, दादाजी खैरनार हे वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहे.