देवळाली : नाशिकजवळील देवळाली रेल्वे स्थानक परिसरात एका बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भगूर येथील रेल्वे ट्रॅक पोल नंबर १७९/३२ जवळ हा बिबट्या अतिशय गंभीर आणि जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता, मात्र वनविभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याला सुरक्षितरीत्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेची धडक इतकी जोरदार होती की या बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक पाय शरीरापासून पूर्णपणे तुटून बाजूला पडला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या बिबट्याची माहिती मिळताच वनविभागाचे विजयसिंह पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
वन्यजीव पशुवैद्यकांनी तपासणी केल्यानंतर असे स्पष्ट झाले की, जखमी बिबट्या ही साधारण ७ ते ८ महिने वयाची मादी आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती सध्या अतिशय चिंताजनक आहे.
वनविभागाने जखमी मादी बिबट्याला ताब्यात घेऊन तातडीने नाशिक येथील वन्यप्राणी उपचार केंद्र, म्हसरूळ येथे हलवले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्यावर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर आणि वैद्यकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे