नाशिक : नाशिक पूर्व वनक्षेत्रातील दिंडोरी, कळवण, येवला, कनाशी, चांदवड, मालेगाव, ताहराबाद आदी क्षेत्रात बिबट्यांचे हल्ले वाढले असून, वर्षभरात 1109 पशुधन बळी पडले आहे. तर चार नागरिक जखमी, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
दिंडोरी, नांदगाव, येवला, कनाशी, मालेगाव, सटाणा, ताहराबाद आदी क्षेत्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. उसाची पूर्ण वाढ होण्यास जवळपास 10 महिने लागतात. यामुळे बिबट्या अन् त्याची पिले उसाच्या पीकक्षेत्रात जवळपास 9 महिने राहतात. परिणामी या भागात बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. उपजीविकेसाठी शिकार करावी लागत असल्याने बिबट्यांकडून या भागात पशुधनावर हल्ल्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. वर्षभरात बिबट्यांकडून जिल्ह्यातील 12 वनक्षेत्रांमध्ये सुमारे 1109 पशुधनाची शिकार करण्यात आली. तर विविध वनक्षेत्रात 99 शेतीपिकांचे नुकसान झाले.
नाशिक पूर्व वनपरिक्षेत्रातील दिंडोरी, कळवण, देवळा अन् ताहाराबाद येथे 5 जणांवर बिबट्याने हल्ला केला. यात दिंडोरीतील वनारवाडी येथे राहणार्या विठ्ठल भिवा पोतदार (16) या मुलाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. पोतदार कुटुंबीय हे सातत्याने रोजगारासाठी स्थलांतरित होत असते. पोतदार कुटुंबाकडून बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने शासकीय मदत थांबली आहे.
बिबट्या ऊसपिकांसह मका, डाळिंब, भूईमुगाच्या शेतीतही वास करतो. वर्षभरात बिबट्यामुळे सुमारे 99 शेतीपिकांचे नुकसान झाले. शेतीपिकांच्या नुकसानीपोटी एक कोटीपेक्षा अधिक रक्कम नुकसानभरपाई म्हणून अदा करण्यात आली आहे.
बिबट्यापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे हा एकच उपाय आहे. शेतात जाताना दोन ते तीन जणांच्या गटाने सोबत जाणे, सोबत लाठ्याकाठ्या ठेवणे, रात्रीच्या वेळी शेतीपिकास पाणी देताना टॉर्च सोबत ठेवणे, लहान मुले अन् वृद्धांबाबत विशेष सावधगिरी बाळगणे आदी उपाय करायला हवेत.संतोष सोनवणे, सहायक वनसंरक्षक, नाशिक पूर्व वनक्षेत्र
दिंडोरी 252
कळवण 77
देवळा 47
येवला 109
नांदगाव 45
चांदवड 61
कनाशी 73
उंबरठाण 08
सुरगाणा 21
मालेगाव 113
सटाणा 94
ताहाराबाद 209
एकूण 1109