खर्डे ता देवळा
खर्डे ता देवळा येथे बिबट्या च्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या. (छाया ; सोमनाथ जगताप)
नाशिक

Leopard Attack | खर्डे येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार

पुढारी वृत्तसेवा

देवळा : तालुक्यातील खर्डे येथे शुक्रवारी (दि १९) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार झाल्याच्या घटनेने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि १९) रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे येथील शेतकरी वसंत कारभारी पवार यांच्या घरासमोरील हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातील गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून तब्बल आठ शेळ्या फस्त केल्या. सकाळी उठल्यानंतर पवार यांच्या ही घटना समजली. त्यांनी तत्काळ आसपासच्या ग्रामस्थांना बोलावले.

घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी गवळी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. पशुधनाचे नुकसान झाल्याने त्वरीत नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी वसंत पवार, केदा पवार यांनी केली आहे.

शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुरु केला होता गोटफार्म

शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्या शेतात गोटफार्म तयार करून शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. या गोठ्यात बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला व तब्बल आठ शेळ्या फस्त केल्याने पवार यांचे जवळपास ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या दहशतीने या परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

SCROLL FOR NEXT