निफाड (नाशिक) : येवला येथील महाविद्यालयात परीक्षा देत वडिलांसोबत दुचाकीने घरी परतत असताना नांदगावजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नांदूरमध्यमेश्वर येथील विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.19) रोजी रात्री घडली.
नांदूरमध्यमेश्वर येथील सिद्धी गोपाळा शिंदे (२०) ही विद्यार्थीनी येवला येथील एसएनडीटी कॉलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी परीक्षा असल्याने ती वडिलांसोबत दुचाकीने येवला येथे गेली होती. परीक्षा संपल्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास नांदूरमध्यमेश्वरकडे परत येत असताना धारणगाव नांदगाव दरम्यान नवले वस्तीजवळ बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. बिबट्याने सिद्धी शिंदे हिच्या डाव्या पायाला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली.
जखमी अवस्थेत तिला निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी उपचार केले. तिची प्रकृती स्थिर असल्याने तिला घरी सोडण्यात आले. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विजय दोंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. जखमी विद्यार्थिनीच्या मदतीसाठी अक्षय निकम यांनी तत्काळ धाव घेतली. गोपाळ शिंदे यांनी फोनद्वारे माहिती दिल्यानंतर निकम घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थिनीस रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वनविभागास दिली.