नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सय्यदपिंप्री येथील गोदामात मतदान यंत्रांची सुरू असलेली तपासणी.  pudhari news network
नाशिक

विधानसभा 2024 | 'ईव्हीएम'ची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदान यंत्रांची (ईव्हीएम) तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणीनंतर गुरुवारी (दि.29) राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर यंत्रांची मॉकपॉल प्रक्रिया (Mock Poll, Election Commission) पार पडली.

तयारी निवडणुकीची

  • मतदान केंद्र : ४९१९

  • कंट्रोल युनिट : ६२४७

  • बॅलेट युनिट : १०८८२

  • व्हीव्हीपॅट यंत्र : ६७३९

राज्यात ऑक्टाेबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेचा धुराळा उडणार आहे. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांसाठी जिल्हास्तरावर तयारीला वेग आला आहे. निवडणूक विभागातर्फे जिल्हाभरात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यासोबत आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पंधराही मतदारसंघांसाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्राची प्रथमस्तरीय चाचणी प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. त्यात 6 हजार 247 कंट्रोल, १० हजार ८८२ बॅलेट युनिट तसेच ६ हजार ७३९ व्हीव्हीपॅट यंत्रांचा समावेश आहे.

निवडणूक विभागातर्फे सय्यदपिंप्री येथील गोदामात ही प्रक्रिया राबविण्यात आली. चालू महिन्याच्य १ तारखेपासून सुरू असलेल्या या तपासणीसाठी बंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (भेल) कंपनीचे २६ तंत्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत यंत्रणांची तपासणी केली गेली. दरम्यान, मंगळवारी (दि.२७) तपासणी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजकीय पक्षांना मॉकपॉलसाठी पाचारण करण्यात आले. एकूण यंत्रांच्या ५ टक्के म्हणजे प्रत्येकी ३१५ यंत्रांवर मॉकपॉल घेण्यात आले. यावेळी ६ राजकीय पक्षांचे ११ प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार पंधराही मतदारसंघांसाठी प्राप्त मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपॉलही घेण्यात आले. ही मशिन्स‌् सय्यदपिंप्रीच्या गोदामात पोलिस बंदोबस्तात सीलबंद करण्यात आली आहेत.
डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग)

ईव्हीएम मॉकपॉल प्रक्रिया कशी असते

  • मॉक पोलच्या वेळी उमेदवारांचे किमान दोन पोलिंग एजंट निश्चित वेळेत उपस्थित असतात. पीठासीन अधिकारी प्रमाणपत्रावर याचा उल्लेख करतात. मतदानादरम्यान, बॅलेट युनिट मतदानाच्या डब्यात असते आणि नियंत्रण युनिट पीठासीन अधिकाऱ्याच्या टेबलावर असते. याशिवाय मतदानाच्या डब्यात किमान दोन मतदान अधिकारी आणि सर्व पोलिंग एजंट हजर असतात. मॉक पोल दरम्यान, प्रत्येक उमेदवाराच्या नावाचे बटण यादृच्छिक पद्धतीने किमान तीन वेळा दाबले जाते.

  • या दरम्यान, NOTA बटण दाबून देखील तपासले जाते. हे बटण पोलिंग एजंट दाबतात आणि एजंट उपलब्ध नसल्यास मतदान अधिकारी बटण दाबून मॉक पोल घेतात. ईव्हीएम बटण दाबल्यावर बीपचा आवाज येत नसेल, तर ईव्हीएम बदलले जाते. उमेदवारांची संख्या कितीही असली तरी प्रत्येक मतदानात किमान पन्नास मॉक पोल असतात.

  • मॉक पोलनंतर, संबंधित मतदान केंद्रावरील पीठासीन अधिकारी डुप्लिकेटमध्ये मतदानाचे प्रमाणपत्र तयार करतात आणि तेथे उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधींच्या सह्या घेतात. सूक्ष्म निरीक्षक नेमल्यास त्यांची स्वाक्षरीही घेतली जाते. सेक्टर ऑफिसर प्रत्येक मतदान केंद्रावरून नकली मतदान प्रमाणपत्राची प्रत घेतात. ही संपूर्ण प्रक्रिया रिटर्निंग ऑफिसरच्या देखरेखीखाली पार पडते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT