नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांतील मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. निवडणूक विभागाकडून मंगळवारी (दि.6) प्रारूप याद्यांची प्रसिद्धी झाली. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण मतदार संख्या 48 लाख 78 हजार 450 वर पोहोचली आहे. लोकसभेनंतर जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 297 नवमतदारांची वाढ झाली आहे. (The electoral rolls of fifteen constituencies in the district will be updated.)
मतदार नोंदणी मोहीम
6 ऑगस्ट - प्रारूप यादी प्रसिद्धी
6 ते 20 ऑगस्ट - दावे-हरकतीसाठी वेळ
10/11 व 17/18 ऑगस्ट - विशेष नोंदणी मोहीम
29 ऑगस्ट - दाखल हरकतींवर निर्णय
30 ऑगस्ट - अंतिम मतदारयादी प्रसिद्धी
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानूसार राज्यात मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतदेखील मतदार नोंदणीवर भर दिला जात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात 23 जानेवारीला अंतिम याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली होती. त्यावेळी मतदारसंख्या 46 लाख 50 हजार 640 इतकी होती. त्या तुलनेत गेल्या सात महिन्यांत नवमतदारांची संख्या 1 लाख 30 हजार 297 ने वाढली आहे. त्यामध्ये 18 व 19 वर्ष वयोगटातील 24 हजार 721 नवमतदार असून 20 ते 29 वर्ष वयोगटातील 67 हजार 61 मतदारांची नोंदणी झाली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत 71.3 टक्के पुरुष व 71.86 टक्के स्त्री मतदार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.
जिल्ह्यात एकीकडे मतदार नोंदणी राबविण्यात येत असताना मतदान केंद्रांचाही फेरआढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्याच्या 4 हजार 739 मतदान केंद्रांच्या संख्येत नव्याने 180 मतदान केंद्र वाढली आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या 4 हजार 919 वर पोहोचली आहे.