Pudhari
नाशिक

Malegaon Lecturer Death | चौकशी समितीसमोरच प्राध्यापकाचा मृत्यू; मालेगाव म्युनिसिपल हायस्कूलमधील घटनेने खळबळ

Malegaon Lecturer Death | वारंवारच्या चौकशीमुळे मानसिक दबावाचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षण विभागाची चौकशी समिती तपासणीसाठी आली असताना ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक सोपान खंडेराव बोरसे (५२, रा. वझिरखेडे, मालेगाव) यांची प्रकृती अचानक बिघडून त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

चौकशीसाठी बोलावले असता बोरसे जिन्न्यावरून खाली कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाशिक येथील शिक्षण विभागाची चारसदस्यीय समिती सकाळी सुमारे ११ वाजता म्युनिसिपल हायस्कूलमध्ये तपासणीसाठी दाखल झाली होती.

दुपारी १.३० च्या सुमारास बोरसे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी वर्गावरून घाईने येत असताना ते पडले. या घटनेनंतर उपस्थित शिक्षकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये गेल्या काही काळापासून विविध समित्यांकडून तपासण्या व चौकशा सुरू आहेत.

वारंवारच्या चौकशीमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव निर्माण झाल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला. बोरसे यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. घटनेनंतर शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

गुन्हा दाखल न झाल्यास प्रा. बोरसे यांचा अंत्यसंस्कार न करता मृतदेह शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी नेण्याची भूमिका शिक्षकांनी घेतली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. दरम्यान, प्रा. सोपान बोरसे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

१६ शाळांवर प्रशासक

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या एकूण २६ शाळांपैकी १६ शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळांच्या तपासणीत विविध त्रुटी व आर्थिक अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांनी प्रशासक नियुक्तीची शिफारस केली होती.

त्यानंतर शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संबंधित शाळांची स्वतंत्र सुनावणी घेत प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर संस्थेतील कारभार आधीच चर्चेत असताना प्रा. बोरसे यांच्या मृत्यूच्या घटनेने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

"अधिकारी यापूर्वीच चौकशी करून गेले आहेत, असे असताना पुन्हा पुन्हा पथके पाठवण्याचे कारण काय? आजचा प्रकार राजकीय द्वेषापोटी झाल्याचा आमचा आरोप आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा."— राजेंद्र मार्तंड,
प्राचार्य, म्युनिसिपल हायस्कूल, मालेगाव
"आमच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आमच्या कुटुंबातील आहे. त्यांच्या आरोग्याला, सुरक्षिततेला, स्वच्छतेला आणि भविष्यातील संधींना कोणत्याही परिस्थितीत दुय्यम स्थान दिले जाऊ शकत नाही. गेल्या सहा दशकांहून अधिक काळापासून संस्था याच भावनेतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक प्रत्येक सुधारणा करण्यास संस्था आणि संस्थाचालक म्हणून मी कटिबद्ध आहे."
— डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, समन्वयक, महात्मा गांधी विद्यामंदिर
  • .

  • मालेगावात शिक्षण विभागाच्या चौकशीवरून वाद पेटला; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

  • प्राध्यापकाच्या मृत्यूनंतर शिक्षकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या; गुन्हा दाखल करण्याची मागणी.

  • महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या १६ शाळांवर प्रशासक नियुक्त; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.

  • राजकीय द्वेषापोटी चौकशी सत्र? प्राचार्य राजेंद्र मार्तंड यांचा शिक्षण विभागावर गंभीर आरोप.

  • 'विद्यार्थ्यांचे हित आणि गुणवत्ता आमचे प्राधान्य'; घटनेनंतर डॉ. अपूर्व हिरे यांची प्रतिक्रिया.

  • मालेगावात प्राध्यापक सोपान बोरसे यांच्या दुर्दैवी निधनाने शोककळा; कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

  • शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी मृतदेह नेण्याचा इशारा; मालेगावात शिक्षकांचे आक्रमक आंदोलन.

  • पुढारी विशेष: मालेगाव हायस्कूल चौकशी प्रकरण अन् प्राध्यापकाचा मृत्यू; नेमका वाद काय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT