त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित भाजपची उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता संवाद बैठक  
नाशिक

Devendra Fadnavis | नकारात्मकता सोडा, विजय महायुतीचाच : फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होणार नाही. कार्यकर्त्यांनो नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडा. ताकदीने निवडणूक मैदानात उतरा. उमेदवार भाजपचा असो वा मित्रपक्षाचा, विजयासाठी एकजुटीने लढा. विजय आपलाच होईल. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून महायुतीला सर्वाधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. गत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पसरविलेल्या 'फेक नॅरेटिव्ह'चा भाजपला फटका बसल्याची कबुली देताना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा मंत्री फडणवीस यांनी मांडला. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड असून, २०१४ असो व २०१९ची निवडणूक भाजपला पैकीच्या पैकी जागा मिळाल्या होत्या. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळू शकले नाही. लोकसभा निवडणुकीत ४६ टक्के मते महायुतीच्या वाट्याला आली आहेत. कार्यकर्त्यांनी आणखी मेहनत घेतली तर ५० टक्क्यांच्या पल्ला गाठणे अशक्य नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ताकदीने मैदानात उतरावे.

कांद्याने केला वांदा...

लोकसभा निवडणुकीत 'कांद्याने भाजपचा वांदा' केल्याचे सांगताना फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसा केली. निर्यातमूल्याच्या प्रश्नावरून कांदा पट्ट्यातील शेतकरी भाजप विरोधात गेले होते. आता निर्यात मूल्य घटविल्याने कांदा उत्पादक शेतकरी खूश आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडविला असून, शेतमालाला हमीभाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सोलर योजनेमुळे शेतकऱ्यांना आता वर्षातील ३६५ दिवस दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. आठ हजार कोटींचा पीकविमा दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणले जात आहे, भाजप कार्यकर्त्यांनी या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

नाशिक, नगर, मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार

५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असल्याचे नमूद करत नाशिक, अहमदनगर, मराठवाड्याचा पाणीप्रश्न लवकरच सुटेल. मराठवाडा दुष्काळमुक्त होईल, असा दावा फडणवीस यांनी केला. वोट जिहादच्या प्रश्नाला हात घालताना हा मुद्दा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. भाजपचा मतदार मतदानासाठी घराबाहेर काढा. भाजपची सत्ता आल्यास आरक्षण संपुष्टात आणले जाईल, असा फेक नॅरेटिव्ह काँग्रेसने पसरविला होता. आता अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणविरोधी वक्तव्याने हा फेक नॅरेटिव्ह पुसला गेला आहे. काँग्रेसचा बुरखा फाटला आहे, असेही त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT