नाशिक

पुढारी विशेष : तीन वर्षात नाशिक शहरात २०७ नवजातांचा मृत्यू

अंजली राऊत

[author title="नाशिक : आसिफ सय्यद" image="http://"][/author]
बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन आणि महापालिका अशा त्रिस्तरीय यंत्रणांकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जात असताना नाशिक सारख्या विकसनशील शहरात गेल्या तीन वर्षात तब्बल २०७ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत पावलेल्या अर्भकांमध्ये १२२ मुलगे तर ८५ मुलींची समावेश आहे. अकाली जन्म, जन्म गुंतागुंत, नवजात शिशु संक्रमण आणि जन्मजात विकृती ही नवजात मृत्यूची प्रमुख कारणे आहेत.

नाशिक शहर वेगाने विकसित होत आहे. मुंबई, पुण्याच्याधर्तीवर नाशिक शहरात वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत. नाशिक शहर मेडिकल हब म्हणून नावारुपास येत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवे तंत्रज्ञान नाशिकमधील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता मोठ्या आजारांवरही नाशिकमध्येच उपचार मिळू लागले आहेत. त्यामुळेच लगतच्या ग्रामीण भागातीलच नव्हे तर, उत्तर महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी नाशिकची निवड करतात. वैद्यकीय क्षेत्रात नाशिकची घोडदौड सुरू असताना नवजात बालकांच्या मृत्यूची संख्या धडकी भरवणारी ठरली आहे. गेल्या तीन वर्षात नाशिक शहरात तब्बल २०७ नवजातांचा बळी गेला आहे.

गेल्या तीन वर्षांतील बालमृत्यू
वर्ष                                 नवजात मृत्यूची संख्या
२०२१-२०२२                       ५७
२०२२-२०२३                       ८४
२०२३-फेब्रुवारी २०२४           ६६
एकूण                               २०७

बालमृत्यू म्हणजे काय?
जर एखाद्या मुलाचा त्याच्या जन्माच्या ३० दिवसांच्या आत मृत्यू झाला तर त्याला नवजात मृत्यू म्हणतात. अतिसार, स्तनपानाचा अभाव, कमी प्रतिकारशक्ती आणि बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन न केल्याने बालमृत्यूचे प्रमाण वाढते. जन्मानंतर एक वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणांमुळे तसेच कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

बालमृत्यूचा आलेख चढता
२०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षात शहरात ५७ नवजात बालकांचा मृत्यू ओढावला होता. २०२२-२३मध्ये नवजातांच्या मृत्यूचा दर वाढला. या आर्थिक वर्षात तब्बल ८४ नवजातांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. तर २०२३ते फेब्रुवारी २०२४ या अकरा महिन्यांमध्ये ६६ नवजातांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन वर्षात १२२ मुलगे तर ८५ मुलींचा मृत्यू झाला आहे. शासन तसेच महापालिकेकडून बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असताना बालमृत्यूचा वाढता आलेख चिंताजनक आहे.

कमी वजनामुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
गेल्या तीन वर्षात २०७ नवजातांचे मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक ६४ नवजातांचे मृत्यू जन्मत: वजन १ किलोग्रॅमपेक्षा कमी असल्यामुळे झाले आहेत. मृत्यू पावलेले ४८ नवजातांचे वजन १ ते १.५ किलोच्या आत, ४५ नवजातांचे वजन दीड ते दोन किलो, २४ बालमृत्यू दोन ते अडीच किलो वजनाचे तर अडीच किलोपेक्षा अधिक वजनाच्या नवजातांच्या मृत्यूची संख्या २८ इतकी आहे.

बालमृत्यूचे प्रकार व कारणे
प्रसूतीपूर्व मृत्यू, नवजात मृत्यू आणि प्रसवोत्तर मृत्यू असे बालमृत्यूचे तीन प्रकार आहेत. ८६ टक्के बालमृत्यू हे संक्रमण, अकाली जन्म, प्रसूतीदरम्यान होणारी गुंतागुंत, पेरिनेटल श्वासोच्छवास आणि जन्माच्या दुखापतींमुळे होतात. ९९ टक्के बालमृत्यू हे विकसनशील देशांमध्ये घडतात. बालमृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे जन्म दोष. पाण्याची खराब गुणवत्ता आणि अर्भकाचे स्वच्छता, कुपोषण आणि अपुरी वैद्यकीय आणि प्रसूतीपूर्व काळजी ही देखील बालमृत्यूची काही प्रमुख कारणे आहेत. गर्भधारणेदरम्यान मातेकडून धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन, प्रसूतीपूर्व काळजीचा अभाव आणि औषधांचा वापर यामुळे गर्भधारणेदरम्यान गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. मुदतपूर्व जन्म आणि कमी जन्माचे वजन, जन्मजात दोष आणि गुदमरणे आणि माता गर्भधारणेच्या गुंतागुंत, जन्मत: व्यंग, डाऊन सिंड्रोम, तसेच हृदय दोष, ही बालमृत्यूची प्रमुख कारणे आहेत. बालमृत्यूवरही पर्यावरणाचा परिणाम होतो. त्या ठिकाणचे वातावरण चांगले आणि प्रदूषणमुक्त नसेल तर मृत्यूची शक्यता अधिक असते. ज्या ठिकाणी युद्ध सुरू होते, त्या ठिकाणी बाळंतपणाचा ताण स्त्रियांवर होतो आणि त्याचा शरीरावर व गर्भावर वाईट परिणाम होतो.

बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना
बालमृत्यूदर कमी करण्यासाठी शासन तसेच महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सरकार राबवत असलेली धोरणे किंवा कार्यक्रम बालमृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकतात. जनजागृती, कुपोषण रोखण्यासाठी उपाययोजना, विशेषतः महिलांच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, शौचालय वापरल्यानंतर किंवा जेवण्यापूर्वी हात साबणाने धुतल्यास अनेक मुलांचे प्राण वाचण्यास मदत होते. प्रसूतीपूर्व काळजी, तसेच गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणी, काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून बाळाचा जन्म गुंतागुंत न होता होईल. फॉलीक ऍसिड सारख्या आईने पूरक आहार घेतल्यास एक प्रमुख कारण म्हणजे जन्म दोष होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते. गर्भधारणेदरम्यान आईने कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल किंवा तंबाखूचे सेवन करू नये. जन्मानंतर, बाळाला 6 महिने स्तनपान दिले पाहिजे कारण यामुळे बालमृत्यूची शक्यता कमी होते. मुलाला चांगला आणि पौष्टिक आहार दिल्यास त्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मुलांना आवश्यक लसीकरण मार्गदर्शक सूचनांनुसार ठराविक वेळेत द्यावे. सडन इन्फंट डेथ सिंड्रोमची शक्यता ५० टक्क्यांनी कमी करण्यात मदत होईल. प्रसूतीपूर्व काळजी आणि माता आरोग्य गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत कमी करण्यात मदत करू शकते. नवजात आणि अर्भकांना पुरविलेले योग्य पोषण सेवन त्यांच्या बालपणात आरोग्यविषयक गुंतागुंत टाळू शकते. लहान मुलांसाठी, पोषणाचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे स्तनपान.

नवजात बालकांची काळजी, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात बालकांची काळजी, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, ॲनेमियामुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व मिशन आणि नवसंजीवनी योजनांची अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT