Lasalgaon Vinchur Road Repair Pudhari
नाशिक

Lasalgaon Vinchur Road Repair | लासलगाव-विंचूर रस्त्यावरील डागडुजीस सुरुवात; रस्ता कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह

Lasalgaon Vinchur Road Repair | लासलगाव-विंचूर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची अखेर डागडुजी सुरू; ओल्या सिमेंटवरून वाहनांची वर्दळ सुरूच राहिल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

विंचूर-प्रकाशा महामार्गावरील लासलगाव ते विंचूरदरम्यानच्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे आणि उघड्या पडलेल्या लोखंडी जाळ्यांबाबत दै. 'पुढारी'ने १७ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करताच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत रस्त्याच्या डागडुजीचे कामकाज सुरू केले. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लासलगावातील कोटमगाव चौफुली ते लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेदरम्यान काँक्रीट रस्त्यातील लोखंडी गज उघडे पडल्याने तसेच मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताचा धोका वाढला होता. या गंभीर समस्येकडे 'पुढारी'ने लक्ष वेधल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजविण्याची आणि रस्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेतली. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असताना ओल्या सिमेंटच्या भागाभोवती आवश्यक संरक्षणात्मक जाळ्या, बॅरिकेड्स किंवा इशारा फलक लावले नाहीत.

परिणामी अनेक वाहने थेट ओल्या सिमेंटवरून गेल्याने त्या ठिकाणी सिमेंटचा चिखल होऊन नव्याने केलेल्या कामाच्या टिकाऊपणाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी वाहनांच्या चाकांचे ठसेही उमटल्याचे दिसून आले.

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले असले, तरी दुरुस्तीची कामे करताना आवश्यक सुरक्षितता उपाययोजना आणि दर्जेदार अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात अशा कामांदरम्यान योग्य संरक्षणव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि दर्जेदार कामावर भर द्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

वाहनांची वर्दळ सुरूच

दै. 'पुढारी' मध्ये दि. १७ जुलैला वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीचे काम तातडीने सुरू केले. मात्र, ओल्या सिमेंटच्या कामाला संरक्षण न दिल्याने वाहनांची वर्दळ सुरूच राहिली आणि नव्याने केलेल्या कामावर सिमेंटचा चिखल तयार झाला. त्यामुळे दुरुस्तीची कामे करताना सुरक्षितता आणि गुणवत्तेची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नागरिकांनी अधोरेखित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT