लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दराने ६० ते ७० रुपये किलोपर्यंत मजल मारल्यामुळे शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दिल्लीला ८४० टन कांदा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पडसाद थेट लासलगावच्या कांदा बाजारावर उमटले आहेत. कांद्याच्या सरासरी दरात ४५० रुपयांनी घसरण झाली आहे.
सोमवारी (दि. २४) लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी ४,२५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बफर स्टॉकमधील कांदा दिल्लीच्या बाजारात पोहोचणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर बाजारभावावर दबाव निर्माण झाला. परिणामी कांद्याच्या सरासरी दरात ४५० रुपयांनी घट झाली.
शहरी ग्राहकांना वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी हस्तक्षेप होत असला, तरी त्याचा थेट परिणाम कांदा उत्पादकांच्या बाजारभावावर होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
बाजाारातील मागणी व पुरवठ्याचे संतुलन साधताना सरकारने ग्राहकांबरोबर उत्पादकांच्या हिताचाही विचार करावा, अशी मागणी होत आहे.
बफर स्टॉकमधील कांदा दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये बाजारात उतरणार असल्यामुळे आगामी काळात लासलगावसह प्रमुख कांदा बाजारपेठांमधील दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त कांदा देण्याच्या सरकारी प्रयत्नांचा भार पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या खांद्यावर पडणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथील बाजार समितीत कांद्याला किमान १,०००, कमाल ४,४००, तर सरासरी ३,८०० रुपये क्विंटल दर मिळाला.