लासलगाव (नाशिक) : येथून जवळच असलेल्या थेटाळे येथे रेल्वे अंडरपास बनविला आहे, पण यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
विशेष म्हणजे, गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या अंडर पासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरले गेले होते. मात्र, १५ दिवसांनंतरही या अंडरपासमध्ये पाच ते सहा फूट पाणी आहे. रात्रीतून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने येथील वाहतूक बंद आहे. परिणामी, परिसरातील विद्यार्थी शेतकरी व नोकरदार वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
या मार्गावरून शालेय विद्यार्थी शेतकरी व नोकरदार यांचे मोठे प्रमाणात रेलचेल असते पण यात पाणी साचलेले असल्यामुळे सध्या वाहतूक ठप्प झाले आहे पाणी जास्त असल्याने काही घटना घडू शकते त्यामुळे रेल्वेने तात्काळ लक्ष घालून पाण्याचा उपसा त्वरित करावा व कायमस्वरूपी तोडगा काढावा.जगन शिंदे, शेतकरी, थेटाळे
निफाड- येवला रोडचे काम चालू असल्याने पर्याय रस्ता म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, तोही बंद असल्याने वाहनचालकांची अडचण निर्माण होत आहे. पंधरा दिवस उलटून गेले तरी रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही विद्यार्थ्यांची परीक्षा कालावधी असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या अंडरपासमधून लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीत जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तरी रेल्वे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष घालून त्वरित रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नाशिक : राज्यातील महापूर, अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या बळीराजासाठी ग्रामपंचायत अधिकारी सरसावले असून, त्यांनी आपल्या एक दिवसाचे वेतन नुकसानग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (डी.एन.ई-136) चे राज्यध्यक्ष संजीव निकम, सरचिटणीस सुचीत घरत यांनी त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मुंबईत देण्यात आले. राज्यभरातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे एक दिवसांचे वेतन (अंदाजे 4 ते 5 कोटी रुपये) हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी युनियनच्या निर्णयाचे स्वागत केले.मंत्री महाजन यांनी स्वतः माईक हातात घेऊन प्रेस समोर ग्रामपंचायत अधिकारी युनियनने एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची घोषणा यावेळी केली. मंत्री गोरे यांनी युनियनने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यांची वेतन श्रेणी ग्रामविकास अधिका-यांना लागू करणे, कलम 49 दुरुस्तीच्या फाईल संबंधी चर्चा केली. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये कलम 49 दुरुस्तीसाठी प्रयत्न असतीलअसे यावेळी सांगण्यात आले.