लासलगाव (नाशिक) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सदस्य भीमराज निवृत्ती काळे यांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी दिली आहे.
मरळगोई खु. ता. निफाड येथील प्रसाद अंबादास फापाळे व मानोरी खु. ता. निफाड येथील रोहीत तात्या वावधाने यांनी केलेल्या अर्जाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या तक्रारीनुसार, भिमराज काळे यांचा मुख्य व्यवसाय शेती नसून ते अनुदानित शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
काळे हे के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक तसेच पूर्वाश्रमीच्या रानवड प्रतिष्ठान संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काकासाहेबनगर येथे अनुदानित पूर्णवेळ क्रीडा शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांचे मुख्य उत्पन्न नोकरीतून मिळत असून, शेती उत्पन्न नाममात्र असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत सक्षम प्राधिकरणाकडे उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर भरणा पावती सादर करण्यात आलेली नव्हती. शेतमाल विक्रीच्या पावत्यांवरूनही शेती उत्पन्न कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (निवडणूक) नियम २०१७ मधील नियम १०(२) नुसार, ज्यांचे मुख्य उत्पन्न शेतीतून नाही त्यांना समिती सदस्यत्वाचा अधिकार नसतो. या तरतुदीनुसार भिमराज काळे यांना बाजार समितीवर संचालक सदस्य राहण्यास अपात्र ठरवून त्यांचे पद रिक्त करण्यात आले आहे, असे आदेश उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी काढले