लासलगाव (नाशिक) : लासलगाव आगारातील अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवारी (दि. 3) शालेय विद्यार्थ्यांची मोठी परवड झाली. वारंवार तक्रारी करूनही कारभारात कोणतीही सुधारणा न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते शहजाद रफिक पठाण यांनी सोमवार (दि.13) पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
लासलगाव आगारातील अकार्यक्षम अधिकारी, कर्मचार्यांमुळे गाड्या वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शालेय विद्यार्थिनींना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही, तर कामगारवर्गालाही कामावर पोहोचण्यास उशीर होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पठाण यांनी या संदर्भात वाहतूक नियंत्रक, लासलगाव आगारप्रमुख, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांना लेखी निवेदन देऊन अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या या इशार्यामुळे लासलगावसह परिसरात चर्चेचा विषय बनला असून, नागरिकांनीही बससेवा सुधारण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर रवि होळकर, भोला पवार, प्रकाश ठोंबरे, कल्याण होळकर, मिरान पठाण, सागर आहिरे, दुर्गेश गरुड, श्याम साळवे, ज्ञानेश्वर नेटारे यांच्या स्वाक्षर्या आहेत.