नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कथित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि अशोक खरात यांची पत्नी कल्पना अशोक खरात गुरुवारी (दि. १३) शिर्डी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या. न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाच्या आदेशानुसार तपासात सहकार्य करण्यासाठी त्या पोलिसांसमोर हजर झाल्या.
यावेळी तपास अधिकाऱ्यांनी त्यांची सविस्तर चौकशी करून जबाब नोंदवून घेतला.
पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात संबंधित जमीन व्यवहाराशी आपला कोणताही थेट संबंध नसल्याचा दावा कल्पना खरात यांनी केल्याचे समोर आले आहे.
शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्याकडून संबंधित जमीन अशोक खरातनेच खरेदी केली असून, व्यवहारातील निर्णय, कागदपत्रांची प्रक्रिया आणि इतर बाबी पती अशोक खरात यांनीच हाताळल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. या व्यवहारातील कोणत्याही व्यक्तीशी आपला परिचय नसल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
शिर्डीलगत निघोज परिसरातील गट क्रमांक १०६/२ मधील सुमारे चार एकर जमिनीच्या व्यवहाराबाबत शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक तसेच आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास करून अशोक एकनाथ खरात, कल्पना अशोक खरात यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
कल्पना खरातने राहाता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्या पोलिसांसमोर हजर झाल्या.
चौकशी संपल्यानंतर कल्पना खरात यांनी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला. पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता त्या निघून गेल्या. त्यामुळे जमीन व्यवहारात त्यांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. त्यांच्या जबाबातील माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि इतर आरोपींचे जबाब यांची पडताळणी केल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.