नाशिक : आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडे वर्ग केल्याच्या निषधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. पक्षाची अंगीकृत संघटना एकलव्य आदिवासी आघाडीतर्फे युवा नेते सुजात आंबडेकर यांच्या नेतृत्वात आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन केले. यावेळी आदिवासी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
आंदोलकांना मार्गदर्शन करताना आंबेडकर म्हणाले, आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला वर्ग केल्याने आदिवासी विकासांच्या योजनांवर विपरीत परिणाम होणार आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध नाही मात्र, आदिवासींच्या हक्काचा निधी वर्ग करू नये. निधी वर्ग करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व सामाजिक न्यायमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल कारावा, अशी मागणीही त्यांनी केली. दिशा शेख यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी एकलव्य आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, महासचिव किसन चव्हाण, शहराध्यक्ष अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.