Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ File Photo
नाशिक

Ladki Bahin Yojana| पावणेदोन लाख लाडक्या बहिणींची होणार पडताळणी

'ई-केवायसी'मध्ये गोंधळ : सरकारकडून जिल्ह्याला यादी सादर : अंगणवाडी सेविका करणार पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरल्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ४८० लाडक्या बहिणी अडचणीत सापडल्या आहेत. या लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता होल्डवर असून, आता या सर्वांची गावनिहाय अंगणवाडी सेविकांच्यामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. यात नाशिक तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात ई-केवायसीमध्ये अडचणी झालेल्यांची यादी राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. ही ई-केवायसी करताना काही कारणास्तव महिलांकडून चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी, नियमित हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ४८० महिलांकडून ई-केवायसी करताना चुका झालेल्या आहेत. यामुळे या महिलांचे जानेवारी महिन्याचे पैसे आले नसल्याचे बोलले जात आहे.

अंगणवाडी सेविका करणार पडताळणी

नाशिकसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे २० ते २५ टक्के महिलांकडून ही चूक झालेली असून, आता सरकारच्या आदेशानुसार नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे जानेवारी महिन्याचा लाभ न मिळालेल्या लाडक्या बहिणींच्या बंद असणाऱ्या खात्याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यपातळीवरून प्रत्येक जिल्ह्याला ई-केवायसीमध्ये अडचण झालेल्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे. या यादीनुसार संबंधित जिल्हा महिला बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांमार्फत गावनिहाय संबंधित लाडक्या बहिणींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT