K.V.N.Naik Sanstha Election
पॅनलप्रमुखांना मतपत्रिका बाद होण्याची धास्ती file photo
नाशिक

K.V.N.Naik Sanstha Election | पॅनलप्रमुखांना मतपत्रिका बाद होण्याची धास्ती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असतानाच पॅनलप्रमुखांसह उमेदवारांना मतपत्रिका बाद होण्याची धास्ती भरली आहे. २९ जागांसाठी तब्बल १२० उमेदवार रिंगणात असल्याने सभासदांना मतदान करताना काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये एका मतपत्रिकेवर दिलेल्या मतांपेक्षा अधित मते दिली तर त्या पदासाठी असलेली मतपत्रिका बाद होणार आहे. मते बाद होण्याची नामुष्की टाळण्यासाठी उमेदवार डमी मतपत्रिका घेऊनच सभासदांना मतदान करण्याबाबत माहीती देत आहेत.

केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत यंदा चार पॅनल आणि सहा अपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. येत्या शनिवारी (दि. २७) केव्हीएन नाईक संस्थेच्या आवारात मतदान होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस यांच्या मतपत्रिकेवर प्रत्येकी एक, विश्वस्तांच्या मतपत्रिकेवर एकूण ६, महिला पदाच्या मतपत्रिकेवर २ तसेच कार्यकारिणी संचालकांच्या नाशिक तालुकासह इगतपुरी या मतपत्रिकेवर ४, सिन्नर तालुका मतपत्रिकेवर ३, येवला-मालेगाव मतपत्रिकेवर २, निफाड-चांदवड मतपत्रिकेवर ३, नांदगाव-बागलाण-कळवण या मतपत्रिकेवर २, दिंडोरी-पेठ-सुरगाणा या मतपत्रिकेवर ३ अशा प्रकारे सभासदांना एकूण २९ शिक्के मारावयाचे आहेत. किमान शिक्के मारल्यास मतपत्रिका वैध राहील मात्र, दिलेल्या संख्येपेक्षा जास्त शिक्के मारल्यास मतपत्रिका बाद होणार आहे.

निवडणूक मंडळाचे काटेकोर नियोजन संस्थेच्या इतिहासात प्रथमच एवढे उमेदवार निवडणूकीमध्ये उभे राहिल्याने सभासद मतदारांचा मतदान करण्यासाठी कस लागणार आहे. परिणामी, मतदानास विलंब होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे विहीत वेळेमध्ये मतदान होण्यासाठी पॅनलप्रमुखांनी नियोजनावर भर दिला आहे. तर, निवडणुक निर्णय मंडळाने संस्थेच्या आवारातील महाविद्यालयामध्ये सूक्ष्म नियोजन केले आहे.

SCROLL FOR NEXT