नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 27) मतदान होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या. मात्र, अखेरच्या टप्प्यात नामवंत व्यावसायिक असलेल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याने अखेरच्या क्षणी आरोप- प्रत्यारोप झाले.
हा व्हिडिओ एडिट केलेला असल्याने सभासदांची फसवणूक झाल्याचा आक्षेप घेत काही सभासदांनी थेट आमदार मुंडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यांनीही कोणत्याही पॅनलला समर्थन दिले नसल्याचे सांगितले. उमेदवारांनी अशा प्रकारे व्हिडिओ क्लिप व्हायरल करत संस्थेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांना स्थान देणे उचित नसल्याच्या भावना ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केल्या आहेत.
नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चार पॅनल असल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारांनी सभासदांच्या भेटीगाठी, बैठका घेत आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, अखेरच्या टप्प्यात एका पॅनलकडून आमदार पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओमध्ये संबंधित पॅनलचा उल्लेख करत चिन्ह दाखवण्यात आले. ही बाब सभासदांच्या निदर्शनास येताच त्यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला. यासंदर्भात संबंधित पॅनलच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी व्हिडिओमध्ये आ. पंकजा मुंडे यांनी कामाचे कौतुक केले आहे. मात्र, विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचे सांगत समर्थन केले आहे.
मी कोणत्याही पॅनलचे समर्थन केलेले नसून, माझ्या नावाने व्हिडिओ तयार करून जो व्हायरल केला जात आहे, ते योग्य नाही. कृपया माझे वैयक्तिक सर्वांसोबत हितसंबंध आहेत. तुम्ही माझे समाजबांधव आहात आणि माझ्याकडून चारही पॅनलला खूप शुभेच्छा. कुठल्याही प्रकारचे गालबोट न लावता, शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, हीच विनंती, अशी प्रतिक्रिया आ. पंकजा मुंडे यांनी सभापदापर्यंत दिली आहे.