नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा 'हरित कुंभ - हरित नाशिक' या संकल्पनेवर आधारित असेल, असे महापालिकेने यापूर्वीच घोषित केले आहे. मग, या संकल्पनेचे काय झाले ? मनपाने कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली असतील, तर जुने वृक्ष जतन करण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. त्यामुळे साधुग्रामसाठी तपोवनातील तब्बल १,८०० वृक्षतोडीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
मनसेतर्फे गुरुवारी (दि. २०) तपोवन येथे वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आकेले. 'झाडे जगवा, नाशिक वाचवा, हरित नाशिक, हरित कुंभ' अशा आशयाचा फलक हातात घेत घोषणाबाजी केली. यावेळी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंहस्थ-कुंभमेळ्यासाठी १,१५० एकर क्षेत्रात साधुग्राम उभारण्याचे नियोजन आहे. तपोवनात महापालिकेची ५४ एकर जागा आहे. तेथील सुमारे १,८०० हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांची कत्तल करण्याचे मनसुबे महापालिकेचे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणे हे शहरासाठी व पर्यावरणासाठी चिंतेची बाब आहे. या ठिकाणच्या मोठ्या, प्रौढ झाडांवर पिवळे चिन्ह रेखाटले आहे. त्यात कडुनिंब, चिंच, जांभूळ यांसारखी भारतीय ओळख दर्शविणाऱ्या प्रजातीसुद्धा आहेत. अनेक झाडे इतकी जुनी व मोठी आहेत की, त्यांची नोंद प्राचीन वृक्ष म्हणून आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला उपाध्यक्षा सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे, योगेश दाभाडे, सचिन सिन्हा, बंटी कोरडे, धीरज भोसले, नितीन माळी, संदीप दौडे उपस्थित हाेते.
...तर जगापुढे चुकीचा संदेश
संतांच्या निवासस्थानासाठीच जर इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली, तर जगापुढे अत्यंत विसंगत व चुकीचा संदेश जाईल. मुळात तपोवन 'वनाखाली तप करणे' या अनुषंगाने जर वन राहणारच नसेल, तर मग साधू, महंत तप करणार कुठे, त्यामुळे महापालिकेचा वृक्षतोडीचा प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्याही बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही वेळोवेळी दिलेल्या निर्णयांत परिपक्व वृक्ष तोडू नये, असे नमूद केले असल्याचे मनसेने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.