नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या निधीला कात्री लावण्यात आल्याने या विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू लागला आहे. या योजना निधीअभावी अडचणीत येऊ नये यासाठी आठ कोटींच्या वाढीव निधीची मागणी समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आली आहे.
समाजकल्याण विभागांतर्गत महिला बालकल्याण, क्रीडा, मागासवर्गीय वस्ती विकास व दिव्यांग कल्याण योजनांचा कार्यभार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील एकूण भांडवली तरतुदीपैकी पाच टक्के निधी मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी तसेच क्रीडा व महिला बालकल्याण विभागासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार अंदाजपत्रकात तरतूदही केली जाते. मात्र, बांधकामसह अन्य विभागांकडूनही तरतूद पळवली जाते. गेल्या दोन वर्षात कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध कामे केली जात आहे. त्यासाठी अन्य विभागांचा निधी वळवून निधीची उपलब्धता केली जात आहे. त्यातूनच समाजकल्याण विभागाच्या योजनांना देखील कात्री लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मात्र, यामुळे समाजकल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाल्याने या विभागामार्फत आठ कोटी रुपयांची वाढीत तरतुदीची मागणी करण्यात आली आहे. मागासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजना तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात आणखीन दोन कोटी रुपयांची मागणी करत चार कोटी रुपये वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. मागासवर्गीय वस्ती व प्रभागामधील कामे करण्यासाठी जवळपास २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात आणखी तीन कोटी रुपयांची असे ३०.८९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मागासवर्गीय वस्त्यांमधील पाणीपुरवठा विषयक कामे करण्यासाठी ९.१० कोटी रुपयांची तरतूद अंदाज पत्रकात करण्यात आली. त्यात एक कोटी रुपयांची वाढ करत १०.१० कोटी रुपयांची एकूण मागणी करण्यात आली. मागासवर्गीय वस्त्यांत मलनिसारण व्यवस्थापन विषयक विकासकामे करण्यासाठी ५.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नव्याने एक कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली असून आता ६.३१ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मागासवर्गीय वस्त्यांमधील उद्यान विषयक कामे करण्यासाठी एक लाख रुपयांची तरतूद होती. त्यात नव्याने एक कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली आहे.
सुधारित अंदाजपत्रकाची तयारी
दरवर्षी डिसेंबरअखेर विविध स्त्रोतांतून प्राप्त महसुलाचा अंदाज घेऊन डिसेंबरअखेर सुधारित अंदाजपत्रकाची आकडेवारी तयार केली जाते. त्यानुसार यंदाही प्राप्त झालेला महसूल व होणारा खर्च लक्षात घेता सुधारित अंदाजपत्रकाची आकडेमोड प्रशासनाने सुरू केली आहे.