नाशिक: आगामी सिंहस्थादरम्यान गर्दी नियंत्रणासाठी विद्यमान घाटांसह नव्या घाटांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात गोदावरी नदीवरील कपीला संगमाच्या उजव्या बाजूस व नंदीनी नदीच्या संगमाच्या उर्ध्व बाजूकडील डाव्या बाजूस घाट उभारणे व पोहोच रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामांना गती देण्यासाठी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. भुसंपादन प्रक्रियेस महापालिकेने गती द्यावी, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.
सिंहस्थात भाविकांच्या सोयीसांठी दोन ठिकाणी घाट बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याअंतर्गत कपीला संगम येथे घाट उभारणीसाठी 19 हजार 215 चौ. मीटर तर नंदीनी संगम येथे घाट उभारणीसाठी 27 हजार 080 चौरस मीटर क्षेत्राची आवश्यकता आहे. एकूण 15 हजार 200 चौ. मीटर क्षेत्र संपादन आवश्यक असून त्यासोबतच पोहोच रस्त्यांसाठी अतिरिक्त 31,095 चौ. मीटर क्षेत्र आवश्यक राहणार आहे.
घाटांची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार असून जमिनीचे अधिग्रहण नाशिक महानगरपालिकेमार्फत करावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले आहे.
गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये झालेल्या बैठकीत या संदर्भातील सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्य अभियंता (उत्तर महाराष्ट्र प्रदेश) यांनी 29 जुलैला स्थळ पाहणी करून घाट उभारणीसाठी जागांची अंतिम निश्चिती केली. संबंधित विभागांच्या निरीक्षण टिपणीनुसार घाट बांधकामाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. जागेचे अधिग्रहण मनपाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
घाट बांधणीसाठी महापालिकेमार्फत जमीन संपादन आणि घाटाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मध्यस्थीचा प्रस्ताव अधिकृतरीत्या सादर करण्यात आला आहे.